Mumbai Crime: विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. 


कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. त्यातच मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध तयार झाले होते. जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. प्राथमिक तपासातून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे. 


असा झाला हत्येचा उलगडा


प्रकृती खालावल्याने कमलकांत शाह यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र, कमलकांत शाह यांचा शवविच्छेदन अहवाल पाहिल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आरोपी कविता, पती कमलकांतच्या जेवणात आर्सेनिक आणि थॅलियम मिसळत होती. या विषारी पदार्थांचा परिणाम कमलकांत यांच्या प्रकृतीवर झाला. प्रकृती खालावल्याने कमलकांत शाह यांना 3 सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 17 दिवसांनी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 


कमलाकांत शाह यांच्या निधनानंतर शवविच्छदेन अहवालातील काही गोष्टींकडे पोलिसांचे लक्ष गेले. या शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी भारतीय दंड विधान संहितातील कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा उलगडा झाला. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागील एक दशकापासून सुरू असल्याचे समोर आले. या आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा कट आखला. कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांना 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


प्रकरण काय?


काजल हिच्या प्रेमप्रकरणाची कमलकांत यांना चाहूल लागली होती. यावरून त्यांच्यात वारंवार भांडण देखील होत असे यामुळे काजल आपल्या पतीला सोडून विभक्त राहू लागली. मात्र तिला पुन्हा नातेवाईक यांनी समजावून आणले. यानंतर काजल हीने आपल्या प्रियकराच्या मदतीने जेवणातून स्लो पॉयझन टाकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही गोष्ट कमलकांत किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली नाही. 


ऑगस्ट महिन्यात कमलाकांत यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथेही प्रकृती न सुधारल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले येथे त्यांच्या रक्तातील घटक तपासले असता यात आर्सेनिक आणि थॅलियमचे प्रमाण जास्त आढळून आले. उपचार दरम्यान कमलाकांत यांचा मृत्यू झाला.मात्र कुटुंबीयांना संशय बळावल्याने सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून हे प्रकरण गुन्हे शाखा युनिट 9 कडे वर्ग करण्यात आले.


क्राईम ब्रँच युनिट नऊ कडे वर्ग करण्यात आल्यानंतर संशयतांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर संशय बळावला व यानंतर तांत्रिक बाबी इतर माहितीच्या आधारे तपास करून गुन्ह्याची उकल करण्यात आली. आरोपी काजल शाह आणि हितेश जैनला गुरुवारी अटक करण्यात आली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: