मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागेचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण होणार आहे. सध्या इंदू मिलची जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला वेग येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी दादर येथील इंदू मिलच्या जमिनीचा ताबा राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यात आज बैठक होणार आहे. त्यावेळी या हस्तांतरणावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

पाच वर्षांपूर्वी केंद्रातील व राज्यातील तत्कालीन सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन देण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर या जमीनीवरील उद्योगाचं आरक्षण उठविण्याव्यतिरिक्त सरकारनं कोणतीही कार्यवाही केली नाही.

केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर इंदू मिलची जमीन राज्य सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला गेला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकाचे भूमीपूजनही केले. परंतु राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून ही जमीन राज्य सरकारच्या ताब्यात मिळण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित होता. राज्य सरकारने इंदू मिलची जमीन आंबेडकर स्मारकासाठी आरक्षित करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली.

मात्र जागेच्या हस्तांतरणामुळे रखडलेलं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाला आता वेग येणार आहे.