Indigo Flight Landed In Dhaka Bangladesh: मुंबई : कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा सर्वाधिक परिणाम हवाई सेवेवर होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पडलेल्या दाट धुक्याचा मोठा फटका मुंबईहून (Mumbai News) गुवाहाटीला (Guwahati) जाणाऱ्या इंडिगो विमानाला (Indigo Airlines) बसला आहे. मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport) इंडिगो एअरलाईन्सच्या विमानानं गुवाहाटीला जाण्यासाठी उड्डाण भरलं खरं, पण हे विमान थेट जाऊन पोहोचलं थेट बांगलादेशात (Bangladesh). मुंबईहून गुवाहाटीला निघालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या या विमानाचं शनिवारी (13 जानेवारी) बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे एमरजन्सी लँडिंग करावं लागलं आणि यासाठी कारणीभूत ठरलं दाट धुकं.
मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठी निघालेले प्रवासी इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात स्वार झाले खरे, पण ते विना पासपोर्ट आणि विना व्हिसा थेट बांगलादेशात पोहोचले. दाट धुक्यामुळे विमानाचं गुवाहाटीला लँडिंग करणं शक्य झालं नाही आणि विमानाचं एमरजन्सी लँडिंग थेट बांगलादेशात करावं लागलं. गुवाहाटीला विमान लँड करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, गुवाहाटी विमानतळावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता जवळपास शून्य झाली होती. यामुळे विमान आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरू शकलं नाही. विमाननंतर आसाम शहरापासून 400 किलोमीटरहून दूर असलेल्या ढाकाकडे वळवण्यात आलं.
मुंबई टू बांगलादेश, व्हाया गुवाहाटी
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, इंफाळमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणारे मुंबई युवक काँग्रेसचे माजी प्रमुख सूरज सिंह ठाकूरही इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये उपस्थित होते. त्यांनी आपल्या ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ते मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसले होत. परंतु, फ्लाईट थेट बांगलादेशात लँड झाली.
ना पासपोर्ट, ना व्हिसा आंतरराष्ट्रीय सीमा पार करुन प्रवासी थेट बांगलादेशात
काँग्रेस नेत्यानं सोशल मीडियावर लिहिलं की, "मी इंडिगो 6E फ्लाईट क्रमांक 6E 5319 मुंबईहून गुवाहाटीला निघालो होतो, पण दाट धुक्यामुळे विमान गुवाहाटीमध्ये उतरू शकलं नाही. त्याऐवजी ते बांगलादेशात ढाका येथे उतरलं." पुढे बोलताना ते म्हणाले की, "विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली."
इंडिगो एअरलाईन्सनं काय म्हटलं?
इंडिगो एअरलाईन्सनं याबाबत सांगितलं की, मुंबईहून विमानात बसलेले लोक गुवाहाटीला जाणार होते, पण ते बांगलादेशात पोहोचले. मुंबईहून गुवाहाटीला जाणारं इंडिगो फ्लाइट 6E 5319 हे गुवाहाटीमधील खराब हवामानामुळे बांगलादेशच्या ढाका विमानतळावं उतरवण्यात आलं. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आता इंडिगो कंपनी बांगलादेशची राजधानी ढाका येथून गुवाहाटीपर्यंत प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करत आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं की, गुवाहाटीमध्ये अत्यंत खराब हवामान आणि धुक्यामुळे पायलटला लँडिंग करण्यात अडचण आली, त्यानंतर एटीसीनं विमान बांगलादेशच्या दिशेनं वळवलं.