Lok Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या घोषणा अद्याप निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच महाराष्ट्रातील शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळी आणि त्यानंतर राष्ट्रवादीत (NCP) पडलेली उभी फूट पाहाता महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) चुरशीची ठरणार यात काही शंका नाही. सध्या राज्यात सत्ताधारी महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) (ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवरा गट)) अशा दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येणार आहे. महाविकास आघाडीचा जागावाटप अजून जाहीर झाला नसला तरीही महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकांसाठी मतदारसंघांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. अशातच सध्या चर्चा रंगली आहे. दक्षिण मुंबईची. दक्षिण मुंबईवरुन (Mumbai South Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
मिलिंद देवरा नाराज? काँग्रेसची साथ सोडणार?
भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत, पण तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरतंय ते लोकसभेचं जागावाटप. मुंबईतील मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जात आहे. याच दाव्यांवरुन आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपला दावा सांगितला. तेव्हापासूनच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे नाराजीचे सूर उमटू लागले. अशातच आता हेच मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा भाजप आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं की, दक्षिण मुंबईवर आमचा (ठाकरे गटाचा) दावा आहे आणि तिकडे उमेदवार देखील आमचाच असणार आहे, मिलिंद देवरांच्या नाराजीसाठी हेच कारण ठरलं अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता आपण जर लक्षात घेतलं तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तीन पक्ष एकत्र आहेत. अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही, अशातच संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मिलिंद देवरा यांनी दुसरी वाट पकडल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे असतील, भाजप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, महायुतीकडून आता मिलिंद देवरांना ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अशातच देवरा सध्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसांत लवकरच ते आपला निर्णय घेतील आणि ते आपला पक्षप्रवेश देखील जाहीर करतील, असंही बोलंलं जात आहे.
मिलिंद देवरा हे माजी मंत्री आणि माझी खासदार राहिलेले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये गुजराती, मारवाडी, जैन समाज आहे, तो मोठ्या प्रमाणात मिलिंद देवरा यांच्या संपर्कात आहे. तसेच, देवरांनी सातत्यानं तिथं काम केलेलं आहे, एक मेट्रो पॉलिटिकल चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जातं. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये त्यांचं नावदेखील आहे. कुलाबा, वरळी, लालबाग, परळ या भागांत त्यांनी मोठं काम केलं आहे. अशातच महायुतीलाही एका चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष मिलिंद देवरांकडे एक पर्याय म्हणून पाहात असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Milind Deora Congress : काँग्रेसचे मिलिंद देवरा भाजप आणि शिंदे गटाच्या संपर्कात : ABP Majha