मुंबई : गुगलने आज डॉ. आनंदीबाई जोशी यांचं त्यांच्या १५३व्या जन्मदिनी डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणमध्ये झाला.


लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली आणि आनंदीबाईंनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली.

ज्या काळात महिलांनी बाहेर पडणंही दुरापास्त होतं त्यावेळी आनंदीबाईंनी थेट डॉक्टर होण्यापर्यंतची मजल मारली होती.

आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली. मात्र, त्यांनी प्रॅक्टिस केली की नाही याबाबत बरीच मतमतांतरं आहेत.

डॉ. आनंदीबाई यांचा जन्म कल्याणमधील एका पारंपारिक कुटुंबात झाला होता. वयाच्या 10व्याच वर्षी त्यांचा कल्याणमधील गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता.

14व्या वर्षी आई झालेल्या आनंदीबाई यांचा मुलगा जन्मानंतर 10 दिवसातच दगावला. या घटनेनं त्यांना बराच धक्का बसला. त्यामुळे आपण डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होता. गोपाळराव यांनीही त्यांच्या या इच्छेला विरोध न करता त्यांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला.

पण डॉक्टर बनण्याचा त्यांचा हा निर्णय फार सोपा नव्हता. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण या सगळ्यावर मात करत त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी डॉक्टरकीची पदवीही मिळवली.

परदेशातून परतल्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूरमधील एडवर्ड रुग्णालयात कामही केलं. दरम्यान, त्यावेळी तिथेच त्यांना क्षयाची बाधा झाली. आनंदीबाई या शिक्षणासाठी परदेशी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समुद्र उल्लंघन केलं आहे. असं म्हणत सर्व वैद्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे उपचाराअभावी 1887 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आनंदीबाई यांचा मृत्यू झाला होता.

रखमाबाईंनाही गुगलचं अभिवादन

दरम्यान, आनंदीबाई जोशींप्रमाणे रखमाबाई राऊत यांच्या जन्मदिनानिमित्त देखील गुगलने 22 नोव्हेंबर 2017 साली डुडल तयार केलं होतं.



तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.