मुंबई : स्वराज्याची राजधानी असलेला 'रायगड' पूर्ववत कऱण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा विश्वास अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. शिवपुण्यतिथीनिमित्त एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर ते बोलत होते.


“किल्ले रायगडाला पुन्हा गतवैभव प्राप्त झालं, तर जगातलं आठवं आश्चर्य  महाराष्ट्राच्या मातीत असेल,” असे डॉ. अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दोन अष्ठपैलू व्यक्तीमत्त्व असल्याने, त्या दोन्ही व्यक्तीरेखा साकारणं प्रत्येक अभिनेत्यासाठी आव्हानच असल्याचं मत त्यांनी प्रांजळ पणे व्यक्त केलं.

विशेष म्हणजे, राजाशिवछत्रपती मालिकेसाठी नितीन चंद्रकांत देसाईंनी विचारले असता, आपण ती भूमिका नकारचं त्यांनी यावेळी सांगितलं. याचं कारण विषद करताना ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज थोर व्यक्तीमत्त्व होतंच. त्यात शंका नाही. पण स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीचं चरित्र पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर यायला पाहिजे,” अशी भावना त्यांनी यावेळी मांडली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज साकारताना कोणत्याही अभिनेत्याला शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक पातळ्यांवर काम करावं लागत असल्याचंही मतही त्यांनी यावेळी मांडलं. दरम्यान, हा संपूर्ण कट्टा आज रात्री 9 वाजता तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात.