अहमदनगर : मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात हवा गेली आणि त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख ढासळला, अशी कबुली माजी आमदार आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. त्याचबरोबर शेतकरी आणि ग्रामीण समस्यांकडं दुर्लक्ष झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. अहमदनगरला ते मनसेच्या आढावा बैठकीत बोलत होते.


नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

“पक्ष स्थापनेनंतर मनसेचा आलेख वाढला. मात्र आलेख वाढल्यानं कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं. लोकांच्या विश्वासाला पात्र न झाल्याने आमचा आलेख ढासळला. त्यामुळे अलेख हळूहळू वाढला आसता तर बरं झालं असतं.”, असे नांदगावकर म्हणाले.

राज्यात सध्या तरी आमची ‘एकला चलो’ची भूमिका आहे. भविष्यात नेमकं काय होईल, हे सांगता येत नसल्याचं नांदगावकर म्हणाले.

यावेळी नांदगावकरांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. “राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केलं नाही. आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक कसं घेऊ शकतात?”, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, 20 एप्रिलपासून राज ठाकरे राज्यात दौरा काढणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.