Indian Navy :  वरळीतील नौदल तळ 'आयएनएस त्राता' जवळ उभ्या असलेल्या 16 गगनचुंबी इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र कुणी दिलं?, याची माहितीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक कबुली भारतीय नौदलानं गुरुवारी हायकोर्टात दिली. नौदल तळापासून 500 मीटरपर्यंत ठराविक उंचीच्यावर कुठलंही बांधकाम करता येत नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम तयार करण्यात आलेला आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार वरळीतील नौदल तळाजवळील एकूण 22 इमारतींचा तपशील तपासण्यात आला. त्यातील 4 इमारतींना नौदलानं ना हरकत प्रमाणपत्र दिल्याची नोंद सापडली. एका इमारतीला नौदलाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. त्यामुळे या इमारतीवर कारवाई केली जाईल. तसेच येथील अन्य एक इमारत नौदल‌ बांधणार आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. मात्र उर्वरीत 16 इमारतींना कुणी परवानगी दिली याची माहिती उपलब्ध नसल्याची कबुली नौदलानं दिली आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खथा यांच्या खंडपीठानं या प्रतिज्ञापत्राची नोंद करून घेत शुक्रवारी यावर पुन्हा सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. 


नौदलाची भूमिका


आम्ही नियोजन प्राधिकरण नाही. मुंबई महापालिका व म्हाडा ही नियोजन प्राधिकरण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध असेल. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती तपासली जाऊ शकते.‌ पण त्यासाठी आणखीन वेळ द्यावा लागेल. नौदल तळाजवळ उभ्या असलेल्या इमारतींशी आमचा थेट संबंध येत नाही. भूखंडाच्या सीटी सर्व्हे क्रमांकानुसार आमच्याकडे तपशील आहेत असंही नौदलानं आपल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलं आहे. महापालिका किंवा म्हाडा आमच्याकडे आसपासच्या बांधकामाचे प्रस्ताव पाठवते. नियमानुसार आम्ही या प्रस्तावांवर निर्णय घेतो. हा निर्णय नंतर संबंधित प्रशासनाला कळवला जातो, असा‌ दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?


वरळी येथील शिवाजी नगर शिवकिरण को. ऑ. हा. सोसायटीने ॲड. संजील कदम यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या सोसायटीच्या दोन इमारतीत 96 भाडेकरू आहेत. या इमारतींचे बांधकाम साल 1955-56 मध्ये झालेलं होतं. या जुन्या इमारती पाडून आता तिथं 49 मजली उत्तुंग टॉवर तयार होत आहेत. मात्र या इमारतींच्या पुनर्विकासाला नौदलानं काम बंदची नोटीस दिली आहे. या नोटीसला सोसायटीनं याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे.


नौदलाची परवानगी असलेल्या इमारती -


गोदरेज बेय, अमर नगर को. हा. सोसायटी, प्रेरणा व शांडल्य टेरेस


नौदलाकडून कारवाई होणारी इमारत


हरसिद्धी हाईटस् या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. या इमारतीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं नौदलानं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं आहे.


परवानगीचा तपशील नसलेल्या इमारती 


सी-फेस कॉ. ऑ. हा. सोसायटी, सुराणा रेजिन्सी, न्यू सी-लिंक, हरमेस हाऊस, प्रतीक्षा, रेडरोझ अपार्टमेंट, प्रिया बिल्डींग, स्पोर्टसफिल्ड, सुरया अपार्टमेंट, रहेजा लेजंडस्, इंद्रप्रस्थ, सिद्धी सागर सोसायटी, देसाई ओशनिक, विराज तिआरा, सिद्धिविनायक होरोझोन, ओबोरॉय 360 वेस्ट टॉवर-ए