CM Eknath Shinde :  अजून मी आठ महिने मुख्यमंत्री आहे, आपल्याला खूप फिरावा लागणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर (Palghar) जिल्ह्यातील इतर पक्षांमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. येत्या काही दिवसांत विधानसभा अध्यक्षाकडून आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification) निकाल येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याला आता महत्त्व आले आहे. 


आज मुंबईतील 'नंदनवन' बंगल्यात काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. शिवसेना शिंदे गटाने पालघर जिल्हयात  ठाकरे बंधूंना धक्का दिला आहे. पालघर जिल्ह्यातील उद्धव  ठाकरे गट आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याशिवाय, काँग्रेस पदाधिकारी आणि काही सरपंचांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. त्याशिवाय, ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील वरळी येथील माजी नगरसेविका रत्ना महाले यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सरकार काम करत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते प्रवेश करत आहे. 'शासन आपल्या दारी कार्यक्रम' सर्वात लोकप्रिय आहे. राज्यातील 2 कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील विकास ठाणे सारखा झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. 


आम्ही बंड केलं, त्या दिवशी आमदार श्रीनिवास यांच्या मुलाचा  वाढदिवस होता. पण त्यांनी त्यावेळी आधी लग्न  कोंढण्याचे आणि नंतर बाकीची कामे, असे म्हटले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.


मी अजून 8 महिने मुख्यमंत्री...


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी अजून 8 महिने मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले. आपल्याला खूप कामे करायची असून बरेच फिरायचे असल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना आमदार अपात्रतेची कारवाईची टागंती तलवार असतानाही आपण अपात्र होणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्यानंतर राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करत विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या :