मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीची (INDIA Alliance) आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. तर या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीचीही (Mahayuti) मुंबईत आज आणि उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे. तर महायुतीची बैठक वरळीमध्ये पार पडणार आहे.
देशभरातून येणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताची जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्यात आली आहे. ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार आहे. पार्लेश्वर ढोल पथक मुलींची लेझीम पथक ग्रॅण्ड हयात इथे सर्व नेत्यांचे स्वागत करतील. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व महत्त्वाचे नेते ग्रँड हयात मध्ये उपस्थित राहतील. साडेसहा वाजता इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल. तर आठ वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलां आहे. डिनरमध्ये खास महाराष्ट्रीयन मेन्यू ठेवण्यात आला आहे.
'इंडिया'ची ताकद वाढली
या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. महाराष्ट्रातील डाव पीडब्लूपी(PWP) आणि आणखी एक प्रादेशिक पक्ष इंडियामध्ये सामील झाले आहेत. 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
'या' मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती, जागावाटपाचा फॉर्म्युला, लोगो आणि किमान समान कार्यक्रम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे." दरम्यान इंडिया आघाडीच्या निमंत्रक व समन्वय समितीच्या सदस्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
महायुतीची दोन दिवस बैठक
दुसरीकडे महायुतीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार असून आज संध्याकाळी 8 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि मंत्री यांच्यासह भोजन कार्यक्रम व चर्चा असा कार्यक्रम ठरलेला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह आरपीआय (आठवले गट), आरपीआय (जोगेंद्र कवाडे गट), बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, जन सुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. हे सर्व घटक पक्ष या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.
महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. महायुतीच्या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचसोबत मतदारसंघातील काही प्रश्न असतील. या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी उपनेते यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे. या बैठकीत महायुतीच्या वतीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.
हेही वाचा