Lok Sabha Elections 2024: मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी (30 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, असं सांगितलं. विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे, या पार्श्वभमीवर बैठकीआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही महत्त्वाची वक्तव्यं केली आहेत.


इंडिया आघाडीच्या बैठकीत 28 पक्ष होणार सामील


केंद्रातील भाजपशासित एनडीए सरकारला हरवण्यासाठी देशभरातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी बनवण्यात आली आहे. आता या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत 26 राजकीय पक्षांचा समावेश होता, आता ती संख्या 28 इतकी झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यासोबतच, इंडिया आघाडीच्या बैठकीला सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि बंगळुरू आणि पाटणा येथील बैठकीत सहभागी झालेले सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.


'मुंबईचे संपूर्ण वातावरण इंडियामय झालं'


केंद्रावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, भाजपने सिलिंडरचे दर कमी केले आहेत. इंडिया आघाडीच्या आतापर्यंत झालेल्या दोन बैठकांचं आश्चर्य म्हणजे वस्तूंच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण मुंबईचे वातावरण सध्या इंडियामय झालं आहे.


'देशातील हुकूमशहाविरोधात आम्ही एकत्र'


इंडिया आघाडी जसजशी पुढे जाईल तसतसे ते गॅस मोफत देण्यास सुरुवात करतील, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील हुकूमशहाविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, भारतमातेच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि आमच्यामुळेच भाजपने गॅसचे दर कमी केले, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


'जसजशी इंडिया आघाडी पुढे जाईल, तसा चीन मागे सरकेल'


महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार बैठकीला येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध आम्ही लढणार आहोत, असं ते म्हणाले. लोक भारत आघाडीत सामील होत आहेत. चीनने नकाशात अरुणाचल प्रदेश स्वतःचा असल्याचा दाखवलं आहे.परंतु इंडिया आघाडी जसजशी पुढे जाईल, तसतसा चीन मागे सरकेल, असं नाना पटोले म्हणाले.


काय म्हणाले शरद पवार?


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले , आतापर्यंत इंडिया आघाडीच्या दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकीत जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मायावतींनी घेतलेल्या निर्णयाचा जनतेला विचार करावा लागेल. मायावती भाजपशी संवाद साधत असल्याची माहिती आहे. मी विरोधी पक्षात आहे, याबाबत कोणताही संभ्रम नाही, असंही पवार म्हणाले


'देशाच्या सुरक्षेची जबाबदारीही इंडियाची'


पत्रकार परिषदेदरम्यान अशोक चव्हाण म्हणाले की, आज 28 पक्ष इंडिया आघाडीत सामील झाले आहेत, पूर्वी आमच्या आघाडीत 26 पक्ष होते. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. देशाच्या सुरक्षेची जबाबदारीही इंडिया आघाडीची आहे. 2019 च्या निवडणुकीत आजच्या इंडिया आघाडीतील पक्षांना 23.40 कोटी आणि भाजपला 22 कोटी मतं मिळाली. ज्या राज्यांमध्ये भाजपने पक्ष फोडून सरकार स्थापन केलं, तिथे त्यांचा पराभव झाला.


हेही वाचा:


India Meeting : इंडिया आघाडीची उद्या मुंबईत बैठक, हॉटेलबाहेर त्रिस्तरीय सुरक्षा; 280 खोल्या आरक्षित