India Coronavirus Updates : संपूर्ण जगाची धास्ती वाढवणाऱ्या कोरोनानं (Coronavirus) पुन्हा एकदा चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील अनेक देशांची धाकधूक कोरोनानं (Covid-19) वाढवली आहे. भारतातही कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 5,337 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत 41 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं. 


राजधानी दिल्लीत वाढता प्रादुर्भाव 


देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीबाबत (Delhi) बोलायचं झालं तर, इथे कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आज म्हणजेच, 8 जून रोजी 550 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर एकाचा मृत्यू झाला होता. नव्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत दिल्लीत संसर्गाचं प्रमाण वाढून 2.84 टक्के झालं आहे. राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंतच्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 19,09,991 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 26,214 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 15 मे नंतर बुधवारी दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 15 मे रोजी दिल्लीत, 613 कोरोना संक्रमित आढळून आले होते आणि संसर्ग दर 2.74 टक्के होता. 


गेल्या आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 7 जून रोजी दिल्लीत कोरोनाच्या 450 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे, सोमवारी, 6 जून रोजी कोविड-19 चे 247 नवीन रुग्ण आढळले होते. त्यावेळी संसर्गाचा दर 3.47 टक्के होता. तर, रविवारी, 5 जून रोजी शहरात कोविड-19 चे 343 नवीन रुग्ण आढळून आले आणि संसर्गाचा दर 1.91 टक्के होता.


मुंबईतही वाढतोय प्रादुर्भाव


देशाच्या राजधानीपाठोपाठ आर्थिक राजधानीतही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. देशात सर्वाधिक संसर्गाचा आकडा गाठणाऱ्या शहरांमध्ये मुंबईचाही (Mumbai) समावेश होतोय. मुंबईतही दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाल्याचं दिसत आहे. केवळ आठवड्याभरातच कोरोनाबाधितांची संख्या दुपटीनं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी मुंबईत कोरोनाच्या 1,765 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही 26 जानेवारीनंतर एका दिवसातील सर्वाधिक वाढ होती. 


अहवालानुसार, मुंबईत 2 जून रोजी कोरोनाच्या 704 रुग्णांची नोंद करण्यात आली होती, जी 7 जून रोजी 1,242 वर पोहोचली. शहरात जूनच्या पहिल्या दिवसापासून दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्याही 700 च्या पुढे गेली आहे. 4 जून रोजी मुंबईत 889 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 5 जून रोजी हा आकडा 961 पर्यंत वाढला. 7 जून रोजी रुग्णांची संख्या तीन अंकांवरून चार अंकांवर पोहोचली आहे. 


मुंबईत आढळणाऱ्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढत आहे. बुधवारी तब्बल 1765 कोरोना रुग्ण आढळले. तसेच रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगानं वाढत आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा दरही एका दिवसात हजारच्या खाली गेला असून 866  दिवसांवर गेला आहे. ही आकडेवारी मुंबईकरांसाठी  चिंतेचा विषय  आहे.