विरार (पालघर) : विरारमध्ये एकाच घरातील दोन सुनांचा हुंड्यासाठी छळ करुन, सासू-सासऱ्यांनी दीड लाख रुपयांना त्यांची विक्री केल्याचा खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन्ही सुना एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. या दोन्ही बहिणींवर अत्याचारही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या पुढाकारामुळे सदर प्रकरण उघडकीस आलं आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात सासरच्या 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार पश्चिमेच्या एम बी इस्टेटमधील सुमन कॉम्पलेक्समध्ये रावल कुटुंब राहतं. या कुटुंबातील संजय आणि वरुण या दोन भावांचे दोन सख्ख्या बहिणींशी 10 मार्च 2015 रोजी लग्न झालं होतं. संजय हा बिझनेसमन आहे, तर वरुण हा सीए आहे. लग्न झाल्यानंतर सहा महिने सगळं काही सुरळीत चालंल होतं. मात्र त्यानंतर रावल कुटुंबियांनी या दोन्ही बहिणीचा हुंड्यासाठी अतोनात छळ करण्यास सुरुवात केली.
दुकान टाकण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून दोन्ही सुनांकडून पाच लाखांची मागणी करण्यात येत होती. परस्पर त्यांच्या वडिलांकडून 5 लाख घेतलेही. त्यानंतर पुन्हा 4 लाखांची मागणी केली. पण ती पूर्ण होऊ न शकल्याने त्या पीडित बहिणींचा शारीरिक, मानसिक छळ सुरु केला.
30 ऑगस्ट 2018 रोजी विरारमधील रावल कुटुंबीय या दोन्ही सुनांना घेऊन सर्व कुटुंबासह त्यांच्या मूळगावी राजस्थान येथे घेऊन गेले. 1 ते 9 सप्टेंबरपर्यंत त्यांना राजस्थानच्या सिरोहा जिल्ह्यातील पिनवाडा तालुक्यात ठेवण्यात आले. त्या ठिकाणी कुटुंबातील काहींनी त्यांचा लैंगिक, मानसिक आणि शारीरिक छळ करून, पुन्हा त्यांना तुमच्या पतीकडे विरारला जा असे सांगून विराराला एका अनोळखी इसमासोबत पाठवलं. वसईला गाडी थांबल्यानंतर त्या उतरण्याचा प्रयत्न करीत असताना त्या अनोळखी माणसाने मात्र त्यांना उतरण्यास विरोध करून मिरारोड येथे घेऊन जात होता. त्याने त्याच्या बॅगही त्याच्या सोबत ठेवल्या होत्या.
एवढेच नाही, तर तुमच्यासाठी मी तुमच्या सासऱ्याला दीड लाख रुपये दिले आहेत. ते मी कसे वसूल करतो, ते पहा अशी धमकीही दिली. रेल्वेत हा सर्व प्रकार सुरु असल्याने रेल्वेतील एका गुजराथी आणि साऊथ इंडियन कुटुंबाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी या दोन्ही पीडित मुलींना मदत करुन वसईत उतरवले आणि त्यामुळे त्याची सुटका झाली. त्यानंतर त्या नालासोपारा येथे राहणाऱ्या त्यांच्या भावासोबत विराराला आल्या. तेव्हा मात्र त्या दोघींचे नवरे विरारला नव्हते.
त्यानंतर सोसायटीत राहणाऱ्यांनी दोन्ही बहिणींना मानसिक बळ देऊन, तक्रारीसाठी विरार पोलिस ठाणे गाठलं. मात्र पोलिसांनी एका महिन्यापासून त्यांची तक्रारच घेतली नाही. शेवटी पोलीस अधीक्षकांकडे आपलं गाऱ्हाणं मांडल्यानंतर त्यांच्या आदेशाने विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सासरच्या पती, दीर, सासू, सासरे यांच्यासह 12 लोकांवर भा.द.वि.स. कलम ४९८अ, ३५४अ, ३५४ब, ३१३, ३२३, ५०४, ५०६, ३४, ३७० प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पती संजय रावल, दीर वरुण रावल, सासू लिलादेवी रावल, सासरे मोहनलाल रावल, मामे सासरे गजेंद्र रावल, काकी सासू आशा रावल यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून, अद्याप याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरु असल्याचे पोलीस सांगत आहेत.
हुंड्यासाठी दोन सुनांची दीड लाखांना विक्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2018 10:37 AM (IST)
सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या पुढाकारामुळे सदर प्रकरण उघडकीस आलं आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात सासरच्या 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -