ठाणे : भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना प्राधान्य मिळावे यासाठी अनेक उपक्रम केले जातात, पण हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. ठाण्यात मात्र अविनाश निमोणकर यांनी अशी इलेक्ट्रिक कार घेऊन भारतातील पहिली हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली गाडी खरेदी करण्याचा मान मिळवला आहे.



महिंद्रा कंपनीची ही गाडी असून, तिच्यामुळे शून्य टक्के प्रदूषण होते. त्यामुळेच या गाडीला हिरवी नंबर प्लेट देण्यात आली आहे. इतकेच नाही तर सरकारी अनुदान आणि करमाफी यांच्यामुळे या गाडीची किंमत तब्बल 4 ते 5 लाख रुपयांनी कमी झाली आहे.



एकदा चार्ज करून 140 ते 150 किमी ही गाडी धावते. त्यामुळे शहरी भागात गाडी चालवणाऱ्या लोकांसाठी इलेक्ट्रिक गाडी घेणं अतिशय उपयुक्त आहे. या गाडीमध्ये आणखी खूप सारी वैशिष्ट्ये आहेत.

काय आहेत गाडीची वैशिष्ट्ये?

या गाडीमुळे प्रदूषण होत नाही, तसेच धुरासाठी पाईप देखील या गाडीला नाही.

घरी 8 ते 10 तास चार्जिंग केल्यावर गाडी 150 किलोमीटर चालते.

डीसी फास्ट चार्जिंग स्टेशनवर 45 मिनिटांत गाडी चार्ज होते.

या गाडीला ना गिअर, ना इंजिन, ना ऑईलिंग त्यामुळे गाडीची देखभाल फारशी करावी लागत नाही.

या गाडीला रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी शुल्क लागत नाही.

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं या गाडीसाठी जवळपास 238000 रुपयांचं अनुदान मिळतं.

उतरन असताना आणि ब्रेक मारल्यावर ही गाडी चार्ज होते. सिग्नलवर असताना बॅटरीचा वापर होत नाही त्यामुळे चार्जिंग संपत नाही.

दरम्यान, राज्य सरकारच्या ताफ्यातही काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत. मंत्रालयात या गाड्यांचं वितरण करण्यात आलं होतं.