डोंबिवली : ‘अपहरणाचा गुन्हा मागे घ्या, नाहीतर घरात घुसून मारु’ अशी धमकी देत डोंबिवलीमध्ये गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली.


डोंबिवलीतल्या पिसवली मार्गावर असलेल्या दुर्गा इमारतीनजीक बिंदास म्हात्रे आणि सूरज म्हात्रे गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी बिंदाससोबत जुना वाद असलेले काही गावगुंड तिथं आले आणि त्यांनी सूरज म्हात्रेला धमकी देत त्याच्या पोटात धारधार शस्त्रानं वार केले. तसंच इतर कुणी याला मदत केली तर त्यांना जिवंतही सोडणार नाही अशी ताकीदही रस्त्यावरील नागरिकांना दिली.

या हल्ल्यात सूरज गंभीररित्या जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही सर्व मारहाण जवळच्याच सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सूरजचा मोठा भाऊ बिंदास यानं या गावगुंडांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच रागातून या गुंडांनी हा हल्ला केला.

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या टोळक्याचा कसून शोध घेत आहेत.