मुंबई : तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत मुंबई श्रीची थरारक शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. एकापेक्षा एक शरीर सौष्ठवपटूंनी रंगलेल्या मुंबई श्रीच्या अंतिम फेरीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने बाजी मारत 'मुंबई श्री'चा किताब पटकावला.


जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर. एम. भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली. फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.

बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनने आयोजनाची संधी युवासेना आणि शिवतेज आरोग्य सेवा संस्थेला दिली होती. भव्यदिव्य मुंबई श्री स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.

ग्रोवेल्स मॉलमध्ये झालेल्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी संघ निवडल्यामुळे सेंट्स लॉरेन्स हायस्कूलच्या पटांगणावर फक्त अव्वल आणि दमदार खेळाडूंचे पीळदार दर्शन मुंबईकरांना अनुभवायला मिळालं. परीक्षकांनी खेळाडूंच्या प्रत्येक पीळदार अंगाचं गुणात्मक निरीक्षण करुन निकाल जाहीर केला आणि त्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात शिक्कामोर्तब केलं.

या धमाकेदार मुंबई श्रीचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार कॅ.अभिजीत अडसुळ, शरीरसौष्ठव संघटनेचे अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनील शेगडे, मदन कडू यांच्या उपस्थितीत पार पडला.

PHOTO : ‘मुंबई श्री’वर सुजल पिळणकरचा कब्जा


गिरणी कामगाराचा मुलगा असलेल्या सुजल पिळणकरला मुंबई श्री आपणच जिंकणार हा विश्वास होता. गेली सात वर्ष तो व्यायामशाळेत घाम गाळत आहे. सुजलला आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचावायचं आहे.

या मोसमात सलग सहा स्पर्धा जिंकल्यामुळे मी फॉर्मात होतोच. या स्पर्धांच्या पुरस्काराच्या जोरावरच मी मुंबई श्रीची जोरदार तयारी करु शकलो. आता मला महाराष्ट्र श्री आणि भारत श्रीमध्येही चांगली कामगिरी करायची आहे, अशी मनिषा सुजलने व्यक्त केली.

जोपर्यंत माझ्या मेहनतीला बळ आणि प्रोत्साहन देणारी नोकरी मला मिळत नाही, तोपर्यंत स्वतःला पूर्ण न्याय देऊ शकत नाही. आमच्या खेळात सर्व सोंगं घेता येतात, पण पैशाचं घेता येत नाही. नोकरी लागली तरच पैशाचं ऑक्सिजन मला मिळू शकेल, अशी मागणी सुजलने केली.

मुंबई श्री 2018 शरीरसौष्ठव स्पर्धेचा गटवार निकाल

55 किलो वजनी गट : 1. संदेश सकपाळ (परब फिटनेस), 2. नितीन शिगवण (वक्रतुंड व्या.), 3. ओमकार आंबोवकर (बॉडी वर्पशॉप), 4. राजेश तारवे (माँसाहेब जिम), 5. किशोर राऊत (परब फिटनेस), 6. वैभव गुरव (दत्तगुरू जिम).

60 किलो वजनी गट : 1. विनायक गोळेकर (मातोश्री जिम), 2. आकाश बाणे (माँसाहेब जिम), 3. तेजस भालेकर (परब फिटनेस), 4. बप्पन दास (आर.के.एम. जिम), 5.उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), 6. तुषार गुजर (माँसाहेब जिम).

65 किलो वजनी गट : 1. प्रतिक पांचाळ (परब फिटनेस), 2. आदित्य झगडे (माँसाहेब जिम), 3. जगदिश कदम (वीर सावरकर), 4. उमेश पांचाळ (आर.एम.भट जिम), 5.तेजस धामणे (बालमित्र व्या.).

70 किलो वजनी गट : 1. विघ्नेश पंडित (कृष्णा जिम), 2. सुजीत महापात्रा (दोंडेश्वर), 3. विशाल धावडे (बालमित्र व्या.), 4. चिंतन दादरकर (आर.एम.भट जिम), 5. जगदीश कदम (आर.एम.भट जिम), 6. अब्दुल कादर (बालमित्र व्या.).

75 किलो वजनी गट : 1. सुशील मुरकर (आर.के.एम. जिम), 2. रोहन गुरव (बालमित्र व्या.), 3. समीर भिल्लारे (हर्क्युलस जिम), 4. सौरभ साळुंखे (परब फिटनेस), 5. अमोल गायकवाड (परब फिटनेस), 6. महेश शेट्टी (पंपिंग आर्यन).

80 किलो वजनी गट : 1. सुशांत रांजणकर (आर.के.एम. जिम), 2. सुयश पाटील (फॉर्च्युन फिटनेस), 3. सुधीर लोखंडे (परब फिटनेस), 4. पवन सोमई (आर.के.एम.जिम), 5. आशिष मिश्रा (परब फिटनेस), 6. रोहन कांदळगावकर (परब फिटनेस).

85 किलो वजनी गट : 1. सुजल पिळणकर (परब फिटनेस), 2. रसेल दिब्रिटो (बॉडी वर्पशॉप), 3. अनिकेत पाटील (ओमसाई फिटनेस), 4. प्रशांत परब (आर.के.एम. जिम), 5. अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन), 6. स्वप्निल मांडवकर (फॉर्च्यन फिटनेस).

90 किलो वजनी गट : 1. सकिंदर सिंग (फॉर्च्युन फिटनेस), 2. सचिन कुमार (माँसाहेब जिम), 3. दीपक तांबीटकर (परब फिटनेस), 4. आतिष जाधव (आर.एम.भट जिम), 5. शैलेश शेळके (माँसाहेब जिम).

90 किलोवरील वजनी गट : 1. श्रीदिप गावडे (गुरूदत्त जिम), 2. महेश राणे (बालमित्र व्या.), 3. नितीन रूपारेल (परब फिटनेस).

सर्वोत्कृष्ट प्रगतीकारक खेळाडू : श्रीदिप गावडे (गुरूदत्त जिम)

मुंबई श्री किताब विजेता : सुजल पिळणकर (परब फिटनेस)

उपविजेता : सकिंदर सिंग (फॉर्च्युन फिटनेस)

द्वितीय उपविजेता : सुशांत रांजणकर (आर.एम.भट जिम)

मुंबई श्री 2018 मेन्स फिटनेस फिजीक्स (170 से.मी.उंची)

1. प्रथमेश बागायतदार (परब फिटनेस), 2. सकिल शेख (भारत जिम), 3. विपलव ठाकूर (मेन्स फिटनेस), 4. मंगेश गावडे (बालमित्र व्या.), 5. केतन ओभद्रा(फॉर्च्युन फिटनेस).

मुंबई श्री 2018 मेन्स फिटनेस फिजीक्स (170 से.मी.वरील)

1. रोहन कदम (आर.के. फिटनेस), 2. शुभम कोदू (बालमित्र व्या.). 3. प्रसाद तोडणकर (फ्लेक्स जिम), 4. माजीद खान (परब फिटनेस), 5. प्रनील गांधी (फॉर्च्युन फिटनेस).