महिलेनं छेड काढणाऱ्याचं गुप्तांग कापलं, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचे दोन साथीदार प्रतीक केणीया आणि तेजस म्हात्रे यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यान्वये अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कल्याण : वारंवार छेड काढणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी त्रस्त महिलेनं त्याचं गुप्तांगच कापून टाकल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेसह तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेच्या जुनी डोंबिवलीत राहणारा तुषार पुजारे हा 27 वर्षांचा तरुण त्याच्या शेजारी राहणाऱ्या 42 वर्षीय विवाहित महिलेला त्रास देत वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होता. आठवडाभरापूर्वी तर तुषारने थेट या महिलेच्या पतीला भेटून महिलेला घटस्फोट देण्याची मागणी केली.
या सर्व प्रकाराला संतापलेल्या महिलेनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं तुषारला काल डोंबिवली पूर्वेच्या नांदिवली टेकडीजवळ बोलावलं. तिथे आल्यानंतर त्याचे हातपाय बांधून मारहाण करत त्याचं गुप्तांग या महिलेनं कापून टाकलं. यात तुषार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचे दोन साथीदार प्रतीक केणीया आणि तेजस म्हात्रे यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यान्वये अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..





















