विधीमंडळात वि.स.पागे संसदीय मंडळातर्फे बुधवारी (11 मार्च) माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, माजी मंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मंत्री राजारामबापू पाटील आणि माजी विधीमंडळ सदस्य डॉ. रफीक झकेरीया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यकर्तृत्वाचे संस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवार बोलत होते.
अयोध्येतील बाबरी मशिदीचं पतन ही भारतातील वादग्रस्त घटना म्हणून ओळखली जाते. "राम मंदिर आंदोलन पेटलं असताना, कल्याण सिंह सरकार बरखास्त करा, असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांना दिला होता. जर नरसिंहराव यांनी हा सल्ला ऐकला असता तर बाबरी मशिद पडली नसती आणि मनुष्यहानी तसंच रक्तपात झाला नसता," असं शरद पवार म्हणाले.
शंकररावांचं मत अप्रिय ठरलं असंत, पण मनुष्यहानी झाली नसती : पवार
शरद पवार यांनी सांगितलं की, "राम जन्मभूमी आंदोलनामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कारसेवक लाखोंच्या संख्येने अयोध्येच्या दिशेने येत होते. परिस्थिती गंभीर असल्याने पंतप्रधान नरसिंह राव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये माझ्यासह शंकरराव चव्हाण, अर्जुन सिंह, माधवसिंह सोळंकी यांचा समावेश होता. वाद टोकाला गेला आहे. आंदोलनामुळे काहीतरी विपरित घडेल, असा अहवाल तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले यांनी अयोध्येतील परिस्थितीबाबत सादर केला होता. या अहवालावर समितीमध्ये चर्चा झाली. विषय अतिशय संवेदनशील होता. कारवाई केली तर दंगली होतील. बाबरी मशिद वाचवायची असेल तर उत्तर प्रदेशातील कल्याण सिंह सरकार बरखास्त करा, असं मत शंकरराव चव्हाण यांनी मांडलं होतं. मात्र या गोष्टीला आमचा विरोध होता. सरकार बरखास्त करणं योग्य नाही असं असं सांगत नरसिंहराव यांच्यासह इतर मंत्र्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या मताविरोधात भूमिका घेतली. मग पुढे बाबरी मशिदीचं काय झालं हे सगळ्यांनाच माहित आहे. मुंबईत 15 दिवस कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. शंकरराव चव्हाणंचं मत अप्रिय ठरलं असतं, पण मनुष्यहानी झाली नसती. रक्तपात झाला नसता. दूरदर्शी असा त्यांचा लौकिक होता."
अयोध्येत राम मंदिर बनणार
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एकेकाळी मंदिर असल्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ती रामजन्मभूमी असल्याचा निकाल नुकताच दिला. त्यानंतर आता तिथे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली असून, लवकरच राम मंदिराचे भूमिपूजनही होणार आहे.
Ram Mandir Trust बनवू शकता तर मशिदीसाठी ट्रस्ट का नाही? : शरद पवार | ABP Majha