मुंबई : विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेयांक पद्धतीसह (Cumulative Grade Point Average) टक्केवारी नमूद असणार आहे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
विविध विद्यापीठाची त्याशिवाय राज्यतल्या विविध शैक्षणिक संस्थाची श्रेयांक पद्धत ही वेगळी असते शिवाय राज्यातील स्वायत्त ( ऑटोनोमस) कॉलेजमध्ये देखील श्रेयांक पद्धत ही ठरवून दिलेली असते व त्यानुसार निकाल दिला जातो. यामध्ये काही विद्यापीठ प्रत्येक सेमिस्टरच्या गुणपत्रिकेत ग्रेड सोबत टक्केवारी सुद्धा नमूद करतात तर काही विद्यापीठ किंवा स्वायत्त शिक्षण संस्था या टक्केवारी नमूद न करता पॉइंटर्स नमूद करून शेवटी ग्रेड दिले जातात. त्यामुळे पॉइंटर्स त्यासोबत ग्रेड आणि एकूण मार्क याची टक्केवारी काढले जाऊन ग्रेड सोबत ते गुणपत्रिकेत दिले जाणार आहेत.
या नव्या निर्णयावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना विभिन्न पद्धतींचा अवलंब केला जातो. यामुळे इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावेळी महाविद्यालयाला आणि नियुक्ती प्राधिकरणाला विद्यार्थ्यांच्या टक्केवारीची आवश्यकता असते. अकृषी विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखापणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेयांक पद्धतीसह गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी'.
याशिवाय आता पुढील वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्राच्या गुणपत्रिकेवर ग्रेड तर दिलेच जाणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक विषयांचे मार्क्स त्या सर्व मार्कांची एकूण काढून टक्केवारी देखील दिली जाणार आहे. फक्त तृतीय वर्ष किंवा द्वितीय तृतीय वर्ष मिळून निकाल गुणपत्रिकेत ना दाखवता संपूर्ण पदवीच्या मार्कांची ऍग्रिगेट टक्केवारी आणि ग्रेड यामध्ये नमूद केली जाईल.
त्यामुळे अनेकदा कोणत्याही प्रवेश परिक्षेवेळी किंवा नोकरीवेळी नुसत्या श्रेयांक गुणपत्रिकेवर असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणी आता या टक्केवारी सुद्धा गुणपत्रिकेत असल्याने येणार नाही. अगदी दहावी आणि बारावी बोर्डाचे गुणपत्रक ज्या प्रमाणे असते त्याचप्रकारे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे हे गुणपत्रक असतील. जेणेकरून राज्यतल्या विद्यापीठातील गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा येईल आणि उमेदवारांच्या गुणपत्रिकेहुन त्याची योग्य पद्धतीने विविध पातळीवर निवड करण्यास सहज शक्य होईल.