मुंबई : जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाने भारतात शिरकाव केला आहे. भारतातील करोना रुग्णांची संख्या वाढून 67 वर पोहोचली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा रुग्ण आहे. पुण्यात आठ, मुंबईत दोन रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. अशाप्रकारे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे.


अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. पाच दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. बुधवारी (11 मार्च) प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार या व्यक्तीला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. तरी, अमेरिकेतून आल्यानंतर ही व्यक्ती नागपुरात कोणाकोणाच्या संपर्कात आली याचा शोध घेणे सुरु आहे. नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

नागपुरातील अकरा संशयित रुग्णांपैकी नऊ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोघांचे अहवाल आलेले नाहीत. बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अहवाल प्राप्त झाला असून यात एकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीचे वय 45 ते 50 च्या दरम्यान असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Corornavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

जगभरात कोरोनाचे 1 लाख 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. त्यापैकी 4 हजार 633 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 68 हजार 286 जण यातून बरे झाले आहेत.

कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित
कोरोना व्हायरस जगातील 100 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसने जगात महामारी म्हणून घोषित केलं आहे. तसंच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावं, असं आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

परदेशातून येणाऱ्यांचे व्हिसा रद्द
परदेशातून भारतात येणाऱ्यांचे व्हिसा 15 एप्रिलपर्यंत सस्पेंड करण्यात आले आहेत. यामधून राजनीतीज्ञ आणि यूएन कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून येणारे भारतीय 14 दिवसांसाठी देखरेखीखाली असतील.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आयोगने 13 मार्च रोजी होणारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबतची बैठक रद्द केली आहे. एअर इंडियाने इटलीला जाणारी विमानं 28 मार्च आणि दक्षिण कोरियाला जाणारी विमानं 25 मार्चपर्यंत रद्द केली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 12462 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोप

आयपीएलवर कोरोनाचं संकट
दरम्यान यंदा महाराष्ट्रात खेळले जाणारे आयपीएलचे सामने कदाचित स्टेडियमऐवजी फक्त टीव्हीवरच पाहायला लागणार आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीवर बंदी आणण्याचा विचार सरकार गांभीर्याने करत आहे. तर, भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत पर्यटक व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात खेळाडूंबद्दल स्पष्ट उल्लेख नसल्याने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या उपस्थितीबाबत आता शंका व्यक्त होत आहे.

शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली
राज्यात हळूहळू हातपाय पसरणाऱ्या कोरोनाचं ग्रहण तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना लागलं आहे. आज औरंगाबादेत होणाऱ्या शिवसेना आणि मनसेच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र असं असलं तरी आज शिवजयंतीचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतला आहे. यासाठी राज ठाकरे औरंगाबादेत दाखलही झाले आहेत. आज सकाळी क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याला राज ठाकरे अभिवादन करणार आहेत. तर, शिवसेनेकडूनही आज औरंगाबादेतल्या सर्व शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल.

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण

युरोपच्या पर्यटकांना 30 दिवस अमेरिकेत प्रवेशबंदी
अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 31 जणांचा बळी घेतला आहे. तर संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्याही हजारावर गेली आहे. देशाच्या 30 राज्यात विषाणूचा प्रसार झाला असून अनेक राज्यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील 30 दिवसांसाठी युरोपच्या पर्यटकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातल्याचं जाहीर केलं आहे.
न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Corona in Mumbai | कोरोना व्हायरसचा मुंबईत शिरकाव; दोघांना लागण | ABP Majha