मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर, अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. हे तर्कवितर्क अजूनही सुरुच आहेत.

आता तर थेट प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी हे भाजपप्रणित एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील, असा अंदाज शिवसेनेने व्यक्त केला आहे.

याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, “2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमत मिळवण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आरएसएस त्या स्थितीसाठी तयारी करत आहे. जर बहुमत मिळण्याची शक्यता कमी वाटली तर संघाकडून प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकतात. भाजप यावेळी कमीत कमी 110 जागा गमावणार हे नक्की”


शर्मिष्ठा मुखर्जी यांची प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या या अंदाजानंतर प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं.

शर्मिष्ठा म्हणाल्या, “मिस्टर राऊत, भारताचे राष्ट्रपतीपदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर, माझे वडील पुन्हा सक्रिय राजकारणात येणार नाहीत”


प्रणव मुखर्जी संघ मुख्यालयात

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 7 जून रोजी नागपुरातील संघ मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत नागपुरात झाला. यावेळी प्रणव मुखर्जींनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना सर्वांसमोर मांडली. संघाच्या मंचावरुन प्रणव मुखर्जींनी देशभक्तीचे धडे दिले.

प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द

प्रणव मुखर्जी यांनी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदं भूषवली आहेत. अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. काही काळासाठी ते काँग्रेसवर नाराजही होते, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाची स्थापना केली, मात्र पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर प्रणव मुखर्जी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, राजीव गांधी यांच्या हत्येनंतरही ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. 2004 साली काँग्रेसने विजय मिळवला तेव्हा प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान असतील, अशी चर्चा होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या पाठिंब्यावर 2012 साली ते राष्ट्रपती झाले.

संबंधित बातम्या 

वसुधैव कुटुंबकम् हीच भारताची खरी ओळख : प्रणव मुखर्जी  

प्रणव मुखर्जी स्वतःच्याच मुलीच्या निशाण्यावर