तसंच आम्ही मोदी आणि फडणवीस यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चिंतीत आहोत असंही या संपादकीय लेखात म्हटलंय. त्याचबरोबर नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या धमकीबाबतच्या कथानकात काही कच्चे दुवे राहिल्यानंच विरोधक टीका करत असल्याचंही ‘सामना’त म्हटलंय.
‘सामना’त काय म्हटलंय?
मुळात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत कोणतेही राजकारण कोणीच करू नये. राष्ट्राचे व राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचे रक्षण व्हायलाच हवे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे हे आपल्या पूर्वसुरींनी म्हटले आहे ते काही उगीच नाही. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांभोवती अभेद्य सुरक्षा कवच उभारणीवर जोर द्यावा लागेल. राजीव गांधी व इंदिरा गांधी यांच्या हत्येतून आपण धडा घेतला पाहिजे. हिंदुस्थानने दोन थोर नेते अशा हिंसाचारात गमावले आहेत. इंदिरा गांधींना खलिस्तानवाद्यांनी तर राजीव गांधींना ‘लिट्टे’ म्हणजे तामिळी अतिरेक्यांनी मारले. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी मारायचे ठरवले असल्याचे उघड झाले. मात्र या हत्या कटाचा जो उत्सव आपल्या राजकीय मतलबासाठी सुरू आहे तो निषेधार्ह आहे.
पुणे पोलिसांनी भीमा-कोरेगावच्या दंगलीमागच्या सूत्रधारांना आता अटक केली व हे सर्व लोक विध्वंसक विचारांचे नक्षलवादी आहेत. मात्र ज्यावेळी या लोकांनी दंगलीचा भडका उडवला त्यावेळी सरकारने काहीच केले नाही. आता सरकारने दंगलीमागच्या हातांना बेडय़ा ठोकल्या. हेच लोक मोदी-फडणवीसांना मारण्याचा कट रचत होते. हे सगळे रोमांचक तितकेच थरारक आहे. अर्थात या कथानकात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेस वाव मिळाला आहे.