ICICI Bank Loan Scam: आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) व्हिडिओकॉन लोन घोटाळा (Videocon Loan Scam) प्रकरणी कोचर दांपत्य आणि वेणूगोपाल धूत यांना दोन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. कोचर दाम्पत्यासह, वेणूगोपाल धूत (Venugopal Dhoot) यांची सीबीआय कोठडी संपत असल्यानं आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सीबीआयकडून तिनही आरोपींची कोठडी वाढवून मागितली. परंतु, कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांकडून सीबीआयच्या मागणीला विरोध करण्यात आला. 


आरोपींच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्यास विरोध दर्शवण्यात आला. तसेच, तीन दिवसांच्या कोठडीत कोणतीही नवी माहिती आरोपींच्या चौकशीतून समोर आलेली नाही. मुळात आरोपींकडे तपासयंत्रणेला देण्यासारखं काहीही नाही, जे होतं ते आधीच तपास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे, असा दावा कोचर दाम्पत्य आणि धूत यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. 


तिनही आरोपींचा जबाब नोंदवून झाला आहे. आता आणखीन काय चौकशी करणं बाकी आहे? आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला विचारला. आम्ही केस डायरी बनवली आहे, अद्याप तपास सुरू आहे. चौकशीचे तपशील तपासाच्या या टप्यावर जाहीर करता येणार नाहीत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला दिली. न्यायधीश एस.एम. मेनजोगे यांच्यासमोर आजची सुनावणी पार पडली. 


कोचर दाम्पत्याला सीबीआयनं दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (24 डिसेंबर) सकाळीच मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता त्यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली होती. या कोठडीत सोमवारी आणखीन तीन दिवसांची वाढ करत ही कोठडी 28 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. या रिमांडला कोचर दाम्पत्यानं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटक आणि कोठडीला आव्हान दिलं होतं. सुट्टीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली. त्यावेळी हायकोर्टानं कोचर दाम्पत्याला तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज कोठडी संपत असल्यानं तिनही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. आज तिघांनाही दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थाकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला दिलेल्या सहा कर्ज वाटपात अनियमितता आढळल्यानं साल 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी कोचर दाम्पत्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. या कर्जांमुळे बँकेचे 1 हजार 875 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा दावा आहे. चंदा कोचर यांनी वैयक्तिक हितासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग करून व्हिडीओकॉनला 3 हजार 259 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. धूत व चंदा कोचर यांचे पती दीपक यांनी एकत्र येऊन न्यूपॉवर रिन्यूएबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होतं. याशिवाय व्हिडीओकॉन समूहाच्या पाच कंपन्यांच्या नावावर 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आलं होते. यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच 2 हजार 810 कोटी रुपयांची परतफेड करण्यात आलेली नाही, असाही सीबीआयनं आरोप केला आहे. याप्रकरणी सोमवारी व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांनाही अटक करण्यात आली असून तिन्ही आरोपींना 28 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.