Yogesh Bhoir Arrested: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक योगेश भोईर (Yogesh Bhoir) यांना क्राईम ब्रांच युनिट अकरानं अटक केली आहे. खंडणी (Extortion and Threats) आणि सावकारी कायद्यानुसार, भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, त्याच प्रकरणात त्यांना आज रात्री अटक करण्यात आली आहे. योगेश भोईर हे ठाकरे गटाचे कांदिवलीतील (Kandivali) उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवकही आहेत. विकासकांकडून दोन कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यावर समता नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला होता. परंतु एका जुन्या गुन्ह्यातलं प्रकरण क्राईम ब्रांच युनिट अकराकडे दाखल झालं. या प्रकरणात त्यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. अखेरीस रात्री सव्वानऊच्या सुमारास योगेश भोईर यांना अटक करण्यात आली.


विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या पत्नीनं मात्र त्यांच्या अटकेला विरोध केला आहे. अटकपूर्व जामीन असतानाही योगेश भोईल यांना अटक करण्यात आल्याचा दावा पत्नीनं केला आहे. परंतु, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, भोईर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला हा नवा गुन्हा आहे. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना क्राइम ब्रांच युनिट 11 नं मंगळवारी रात्री अटक केली. भोईर यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाई विरोधात रात्री शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी क्राईम ब्रँच युनिट बाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा विरोध केला. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रात्री योगेश भोईर यांना कांदिवली येथून दक्षिण मुंबईतील क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आलं. आज (बुधवारी) त्यांना 11 वाजता किल्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 


योगेश भोईर यांना अटक करण्यात आल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भोईर यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाई विरोधात रात्री शिवसैनिकांनी क्राईम ब्रँच युनिट बाहेर जोरदार घोषणाबाजी करत कारवाईचा विरोध केला. त्यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलीस भोईर यांना बाहेर घेऊन आले होते. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रात्री योगेश भोईर यांना कांदिवली येथून दक्षिण मुंबईतील क्राईम ब्रांच कार्यालयात हलवण्यात आलं होतं.


कायदा सुव्यवस्थेसाठी आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय : योगेश भोईर


आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करताना योगेश भोईर बोलताना म्हणाले की, "आपण सर्व शिवसैनिक आहोत. लढण्यासाठी आपला जन्म झाला आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. कोर्टात सगळं व्यवस्थित होईल, सर्व सुरळीत होईल. कोणीही गडबड गोंधळ करू नका. वॉर्डमध्ये प्रत्येक माणूस योगेश भोईर आणि प्रत्येक महिला माधुरीताई या दृष्टीनं आपण काम करायचंय. वॉर्डमध्ये जसं काम सुरू आहे, तसंच काम सुरू ठेवा."


मिंदे सरकार आल्यापासून शिवसेनेवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू : विनोद घोसाळकर


शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं की, "योगेश भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. यासंदर्भात गुन्हे शाखा कक्षाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो. मिंदे सरकार आल्यापासून शिवसेनेवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसाच हा देखील प्रयत्न आहे. एका गुन्ह्याखाली चौकशीसाठी बोलावतात आणि दुसरे गुन्हे त्यांच्यावर नोंदवतात, त्यांना अटक करतात. हे दबावाखाली सर्व सुरू आहे. कारण महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे आहेत. इथले जे गेले आहेत, ते पुन्हा निवडून येणार नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्रास देणं सुरू आहे. आम्ही पोलिसांना सांगितलं आहे, कायदा व्यवस्थित वापरा, कोणाच्या दबावाखाली जाऊ नका. हे सर्व चुकीचं चालंलं आहे, जनतेसमोर जाऊ आणि हे सगळं पुढे उघड करू."