मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा ‘सेल्फी’वाद
सेल्फी काढण्याच्या हौसेपोटी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन वारंवार पोलिस प्रशासन, राज्य सरकार यांच्याकडून केलं जातं. मात्र खुद्द मिसेस मुख्यमंत्र्यांनाच या गोष्टीचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सेल्फी काढत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. क्रुझच्या टोकाला असलेल्या धोकादायक ठिकाणी बसून मिसेस फडणवीस सेल्फी काढताना दिसत आहेत.
मुंबई-गोवा क्रुझचा उद्घाटन सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमादरम्यान क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन सेल्फी घेण्याचा मोह अमृता फडणवीसांना आवरला नाही. त्या एकट्याच क्रुझच्या टोकाला जाऊन सेल्फी घेत होत्या. सर्वात पुढच्या डेकवर सुरक्षा रेलिंग ओलांडून अमृता फडणवीसांनी सेल्फी काढले. त्या जिथे बसल्या होत्या, तिथे जाण्यास बंदी आहे.
अमृता फडणवीसांचा सेल्फी काढून होईपर्यंत बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांच्याही जीवात जीव नव्हता. पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर आणि बॉडीगार्डनी त्यांना या परिस्थितीची जाणीवही करुन दिली, तरी त्या जागेवरुन हटल्या नाहीत. अखेर, त्या धोकादायक टोकावरुन मिसेस मुख्यमंत्री निघाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
मिसेस मुख्यमंत्री सेल्फी घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणांतच वायरल झाला. त्यानंतर नेटिझन्सनी अमृता फडणवीसांना यथेच्छ ट्रोल केलं. सुरक्षेची काळजी न घेता सेल्फी काढल्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.
‘आंग्रिया क्रूझ’
मुंबईतील भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या क्रुझला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. क्रुझवर पर्यटकांसाठी शाही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरुनच या क्रुझचं नाव आंग्रिया असं ठेवण्यात आलं आहे.
व्हिडीओ :