मुंबई : मुंबईहून गोव्याला निघालेलं आंग्रिया क्रूझ आज गोव्यात दाखल झालं आहे. 14 तासांच्या प्रवासानंतर आंग्रिया क्रूझ गोव्यात पोहोचलं. आंग्रिया क्रूझच्या पहिल्या सफरीत एका जोडप्याने लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण त्यांच्या सदैव स्मरणात राहणार आहे. प्रबीर आणि सयाली असं या मुंबईकर जोडप्याचं नाव आहे.
क्रूझ समुद्राच्या मधोमध पोहोचल्यानंतर दोघे विवाह बंधनात अडकले. यावेळी त्यांनी क्रूझवर केक कापून आपला आनंद साजरा केला. क्रूझचे कॅप्टनही या आनंदात सहभागी झाले. "आम्हालाही या लग्नाचा आनंद साजरा करण्याचा हक्क आहे. आंग्रिया क्रूझवर हा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली याबद्दल समाधानी आहे", असं क्रूझच्या कॅप्टन इरविन सिकेरिया यांनी म्हटलं.
मुंबईच्या या जोडप्यानं 20 ऑक्टोबरला कोर्टात लग्न केलं होतं. याच दिवशी आंग्रिया क्रूझ गोव्याला रवाना होणार होतं. त्यामुळे प्रबीर आणि सयाली यांनी आपल्या लग्नाचा आनंद क्रूझवर केक कापून साजरा केला. यासाठीची सगळी तयारी क्रूझच्या कॅप्टनने करुन ठेवली होती.
"कॅप्टन इरविन सिकेरिया यांना 15 वर्षांत 60 क्रूझ शिप ऑपरेट करण्याच अनुभव आहे. मात्र असं पहिल्यादा घडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मला या गोष्टीचा आनंद आहे की भारताच्या पहिल्या क्रूझ शिपला ही संधी मिळाली", असं कॅप्टन इरविन सिकेरिया यांनी म्हटलं.
"क्रूझवर लग्नाचा आनंद साजरा करण्याचा अनुभव आमच्यासाठी खास होता. क्रूझवर आम्ही लग्न केलं याबाबत आम्हाला अभिमान वाटत आहे. हे आमच्यासाठी स्वप्नवत असून, मी क्रूझने पहिल्यांदा प्रवास करत आहे", अशा भावना सयालीने व्यक्त केल्या.
आंग्रिया क्रूझची वैशिष्ट्ये
मुंबई-गोवा प्रवास समुद्रामार्गे करण्याचं स्वप्न आंग्रिया क्रूझ साकार करणार आहे. ही देशातील पहिली अलिशान क्रूझ आहे. या क्रूझमध्ये 104 रुम आहेत. आपल्या बजेटनुसार येथे रुम उपलब्ध आहेत. या क्रूझमध्ये अंडरवॉटर लग्जरी रुमही आहेत.
आंग्रिया क्रूझवर सहा बार दोन रेस्टॉरंट, एक स्विमिंग पूल, डिस्को, स्टडी रुम, एक स्पाची सुविधा आहे. 70 क्रू मेंबर्ससह एकूण 400 प्रवासी या क्रूझवर प्रवास करू शकतात. मुंबई-गोवा समुद्रमार्गे प्रवास 8 तासात पूर्ण होतो, मात्र क्रूझचा आनंद लुटण्यासाठी हा प्रवास 14 तासांचा आहे. या क्रूझचं तिकीट प्रतिव्यक्ती 7 ते 12 हजार रुपये आहे.