शिवसेनेचे बंडखोर सुधीर मोरेंना शिवसेनेने पुन्हा पक्षप्रवेश दिलाय. तर सुधीर मोरेंच्या वहिनी स्नेहल मोरेही सेनेचा भगवा हाती घेणार आहेत. विशेष म्हणजे भाजपनेही मोरेंशी संपर्क साधल्याची माहिती खुद्द मोरेंनी दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अपक्ष कोण आपल्या गळाला लावणार यावर मुंबईचं सत्तेचं गणित अवंलबून असणार आहे.
मोरेंनंतर अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या ते संपर्कात आहेत. मालाड पश्चिमच्या वॉर्ड क्रमांक 41 मधून तुळशीराम शिंदे निवडून आलेत. शिंदे हे माजी शिवसैनिकही आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचा आकडा 86 झाला आहे.
युतीबाबत विचार केलेला नाही : उद्धव ठाकरे
मुंबईच्या जनतेने सलग पाचव्यांदा कौल दिल्याने उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'बाहेर येऊन जनतेचे आभार मानले. मात्र आपण युतीबाबत अजून कसलाही विचार केला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सेना-भाजपला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही : गडकरी
उद्धव ठाकरेंनी युतीचा विचार केला नसल्याचं म्हटलं असलं तरी भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेना आणि भाजपला युतीशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला आहे.
“शिवसेनेसोबतची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली आहे. निवडणुकीच्या काळात मतभेद झाले असले तरी ते तितके टोकाचे नाहीत. जे झालं ते विसरुन मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय नाही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचाराने निर्णय घ्यावा” नितीन गडकरी
महापौर कुणाचा?
शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर महापौर कुणाचा असा प्रश्नही गडकरींना विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, “प्रत्येकालाच आपला महापौर असावा असं वाटतं. मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही मॅच्युअर आहेत, ते योग्य निर्णय घेतील. कारण शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक मतभेद नाहीत”
काँग्रेसची निर्णायक भूमिका
शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे. काँग्रेसने मदत करावी म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेसची द्विधा मनस्थिती असेल. कारण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला मदत करावी, अशी परिस्थिती असली तरी त्याचे देशभर अन्यत्र पडसाद उमटतील आणि अल्पसंख्यांकांच्या मतांवर परिणाम होण्याची भीती आहे.
यामुळेच काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने त्यादृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि अपक्षांसह इतरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांचा पाठिंबा मिळाला, तरी भाजपचे संख्याबळ 100 वर जाईल. सर्वच अपक्ष आणि इतर पक्ष भाजपच्या गळाला लागणं कठीण असल्यानं हे गणित वाटतं तेवढं सोपं नाही. उलट शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिला किंवा बाहेर राहून मदत केली, तरी काँग्रेसच्या 31 जागा आणि काही अपक्षांची मदत मिळवून शिवसेनेचा महापौर आरामात निवडून येऊ शकतो. त्यामुळे महापौर कोणाचा बसणार, हे सर्वस्वी काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून राहील.
‘सपा’चा शिवसेनेला पाठिंबा?
समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत या पक्षाने शिवसेनेला या अगोदर मदत केली आहे. यामुळेच सपाची मदत होऊ शकते, असं शिवसेनेचं गणित आहे.
मनसे शिवसेनेला पाठिंबा देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीआधी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. पण उद्धव ठाकरेंनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. पण आता मनसेची भूमिका निर्णायक ठरु शकते. त्यामुळे शिवसेना मनसेची मदत मागणार का आणि मनसे त्याला प्रतिसाद देणार का, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :