ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस COVID-19 च्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. 30 एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार इथे 940 इतके पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एकूण सहा मोठ्या महानगरपालिका या ठाणे जिल्ह्यात येतात. त्यामुळे मुंबईनंतर ठाणे जिल्ह्याकडे सरकारने सर्वात जास्त लक्ष द्यायची गरज निर्माण झाली आहे.


ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका - 162
नवी मुंबई महानगरपालिका - 230
मिरा भाईंदर महानगरपालिका - 157
उल्हासनगर महानगरपालिका - 9
भिवंडी निजामपूर महानगरपालिका - 13
अंबरनाथ नगरपरिषद - 7
कुळगाव बदलापूर नगरपरिषद - 29
ठाणे ग्रामीण - 23


जरा या महानगरपालिका आणि इतर भागांकडे काळजीपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल मुंबईला लागून असलेल्या या सर्व क्षेत्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त जर कुठे रुग्ण असतील तर ते आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात. ज्यामध्ये असलेल्या झोपडपट्टी आणि अतिशय दाटीवाटीच्या विभागांमध्ये COVID-19 चे रुग्ण आढळू लागले आहेत. यावर खबरदारीचे उपाय म्हणून हे विभाग पूर्णतः सील करण्यात आले आहेत.


तर इतर महानगरपालिकांमध्ये देखील चित्र फारसं चांगलं नाही. या सगळ्या महानगरपालिका सध्या COVID-19 चे रेड झोन बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पहिला रुग्ण 13 मार्च रोजी ठाणे महानरपालिकेच्या हद्दीत आढळला होता, त्यानंतर 13 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत केवळ 240 रुग्ण ठाणे जिल्ह्यात होते. मात्र 13 एप्रिल ते आजपर्यंत हेच रुग्ण 940 झालेले आहेत. त्यामुळे हा रोग किती मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यात पसरतो आहे याचा अंदाज आपल्याला येईल.


मात्र यासाठी कोणत्या उपाययोजना या जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत त्या पाहूयात.


- महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्र मिळून 250 कन्टेंटमेंट झोन
- सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून कन्टेंटमेंट प्रत्येक घरातील व्यक्तींची तपासणी करत आहोत
- जिल्ह्यातच कोरोनाबाधितांवर उपचार व्हावेत यासाठी 16 कोविड रुग्णालयं उपलब्ध आहेत.
- परराज्यातील मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी निवाऱ्याची सोय केली आहे.
- 85 लेबर कॅम्पमध्ये 15 हजार लोकांना दोन वेळचं जेवण
- 70 तात्पुरते निवाऱ्यांमध्ये 1372 जणांचं वास्तव्य
- दीड लाख मजुरांना कम्युनिटी किचनमधून जेवण
- एक लाख लोकांना रेशनचं वाटप


जिल्हा प्रशासन असो किंवा महानगरपालिका असो उपायोजना आणि या रोगाला नियंत्रित करण्यासाठी जी काही पावले उचलावी लागत आहेत ती उचलत आहेत. मात्र काही प्रमुख अडचणी यांच्यासमोर आहेत. त्या म्हणजे अतिशय दाटीवाटीची लोकवस्ती, भाजी मार्केट सारख्या परिसरामध्ये होणारी गर्दी, लोकांनी या रोगाला गांभीर्याने न घेणे यामुळे प्रामुख्याने हा रोग ठाणे जिल्ह्यात पसरलेला आहे.


येत्या 2 दिवसात हाच आकडा हजारांचा टप्पा पार करेल. त्यामुळे ठाणेकरांना अजून सतर्क आणि संयमी राहण्याची आवश्यकता आहे.