मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी 50 टक्के उपस्थित राहण्याबाबतचे  20 मार्च 2020 रोजीचे आदेश रद्द करून 100 टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे परिपत्रक 30 एप्रिल 2020 रोजी जारी केले आहे. त्याची अंमलबजावणी त्वरीत लागू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.


आयुक्तांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासनाने जारी केलेल्या या परिपत्रकामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता जे कामगार, कर्मचारी पनवेल, बदलापूर, आसनगाव, वसई इत्यादी किंवा पुढे राहत असतील त्यांनी महापालिकेच्या हद्दीतील निकटच्या विभाग कार्यालयांमध्ये सेवा द्यावी, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे विभाग कार्यालयांनी अतिरिक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची सेवा कोविड संदर्भातील उपाययोजनासंबंधी वापरावी आणि दर महिन्याला त्याचा हजेरीचा अहवाल कर्मचाऱ्याच्या मूळ खात्याला अथवा विभागाला कळवावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असेल तसेच प्रशासनाने कळवल्यानंतरही जे कर्मचारी व अधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार नाहीत,  विना परवानगी ते अनुपस्थित राहतील त्यांना स्मरणपत्रे पाठवावी. त्यानंतरही ते कर्तव्यावर येत नसतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी या परिपत्रकाद्वारे दिले आहेत.


खातेप्रमुख किंवा विभागाने उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्यास त्यानुसार कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक असेल असेही यात नमूद केले आहे.


55 वर्षावरील मधुमेही, उच्च रक्तदाब डायलिसिस कर्मचाऱ्यांना सूट

मुंबई महापालिकेच्या 55 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना जर मधुमेह, उच्च रक्तदाब, डायलिसिस अशा स्वरुपाचे आजार असल्यास त्यांना पुढील 15 दिवस सुट्टी राहणार आहे. त्यांना पुढील 15 दिवस कर्तव्यावर उपस्थित राहण्यास प्रशासनाने सूट दिलेली आहे. मात्र, कोणतेही आजार नसलेल्या 55 वर्षे किंवा त्यापुढील कर्मचारी तथा अधिकाऱ्यांना तसेच डॉक्टर्स यांना कोविड रुग्ण असलेल्या ठिकाणी नेमणूक न करण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.