मुंबई : "3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने आपण पावलं टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री म्हणाले की, "3 तारखेनंतर आता जेवढी बंधनं त्यापेक्षा अधिक मोकळीक प्रत्येक झोननुसार देणार आहोत. पण घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाईल. काम सगळ्यांचीच अडली आहेत. पण आजपर्यंत बंधनं पाळली, सगळी बंधन उघडताच आर्थिक फटका बसणारच आणि विषाणू जीवावर उठेल. त्यामुळे आपण धीराने, खंबीरपणाने, सावधपणाने पावलं टाकत आहोत."


राज्यातील जनता हीच खरी संपत्ती
देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन 3 मे नंतर उठणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. याविषयी उद्धव ठाकरे म्हणाले की, "अर्थचक्र रुतलंय, मोठा आर्थिक फटका बसणार, बेरोजगारी वाढणार हे खरं असलं तरी प्रत्येक राज्याची किंवा राष्ट्राची खरी संपत्ती ही जनता आहे. जनता वाचली पाहिजे. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो."


रेड झोनमध्ये आता काही करणं हिताचं नाही
मुंबई आणि शेजारचा परिसर, पुणे, नागपूर यासारख्या रेड झोनमध्ये काही करणं आता हिताचं नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच ऑरेंज झोनमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत, पण काही अॅक्टिव्ह केसे आहेत ते जिल्हे वगळता, उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय करु शकतो याचा विचार सुरु आहे. तर ग्रीन झोनमधल्या अटी-शर्ती हळूहळू काढत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.


"रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे ज्वालामुखी जो पेटेल असा वाटत नाही," अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या झोन वर्णन केलं.


तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये?


रेड झोन : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर


ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा

परराज्यात जाणाऱ्यांना शिस्तीने पाठवणार
परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांना अत्यंत शिस्तीने पाठवलं जाईल. संबंधित राज्यांशी सरकारशी बोलून व्यवस्था करुन त्यांना पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. "तसंच इतर राज्यातील लोकांना आपल्याला आणावं लागणार आहे. राज्यातल्या राज्यात म्हणजे जे लोक गावाला किंवा पर्यटनाला गेले आणि लॉकडाऊनमुळे अडकले, त्यांना एकत्र आणणार नाही. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून प्राधान्य ठरवून त्याच्या जाण्या-येण्याची सोय करु," असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


शेतीवर बंधनं नाहीत
दरम्यान शेतीवर कोणतीही बंधनं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. "शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं पुरवली जातील. कृषी मालावर बंधनं नव्हती, मालवाहतूक मोकळी केली आहे. हळूहळू ही बंधनं उठवत आहोत. मात्र झुंबड झाल्यास ही बंधनं पुन्हा टाकली जातील," असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.


आरोग्य कर्मचारी, पोलीस देवासारखं काम करत आहेत
"आपण प्रत्येक पाऊल सावधानतेने टाकायला हवं. कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार व्हावे, रुग्णालयं कमी पडू नयेत. डॉक्टरांवर ताण येऊन यासाठी प्रयत्न सुरु आहेत. टास्क फोर्सचे डॉक्टर होमिओपथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना संपर्क करत आहेत. फीव्हर क्लिनिकमध्ये त्यांनी कसं काम करावं याची चाचपणी करत आहेत. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस देवासारखे आपल्यासाठी खंबीरपणाने लढत आहेत. त्यांना मदत करणं आपलं काम आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.