(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधार कार्डमध्ये जन्मतारीख सहजरित्या कशी अपडेट कराल?
आर्थिक व्यवहारांपासून इतर आवश्यक कामांसाठी आता आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे. त्यामुळे त्यावरील माहिती योग्य असणं गरजेचं आहे. जर आधारवरील जन्मतारीख चुकली असेल तर तुम्ही सहजरित्या ती अपडेट करु शकता. कसं ते जाणून घेऊया.
मुंबई : आर्थिक व्यवहारांपासून इतर आवश्यक कामांसाठी आता आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र बनलं आहे. त्यामुळे आपल्या आधार कार्डवरील सर्व माहिती योग्य असणं आवश्यक आहे. विशेषत: नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव यांसारख्या माहितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु अनेक वेळा ही माहिती टाकताना चूक होते. मात्र आता त्यात सहजरित्या बदलही करता येऊ शकतो. विशेषत: जन्मतारीख ऑफलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्र, पोस्ट ऑफिस किंवा बँकेत संपर्क करावा लागले. याशिवाय तुम्ही ऑनलाईनही आपली जन्मतारीख अपडेट करु शकता. मात्र यासाठी तुमचा मोबाईल आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे, तेव्हाच ऑनलाईल अपडेट करु शकता.
जन्मतारीख कशी अपडेट कराल?
- सर्वात आधी तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) वेबसाईटवर लॉगऑन करावं लागेल.
- वेबसाईटवर गेल्यानंतर 'मेरा आधार' या सेक्शनमध्ये जाऊन 'अपडेट डेमोग्राफिक डाटा ऑनलाईन' वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर नवं पेज सुरु होईल, ज्यात 'प्रोसिड टू अपडेट आधार' लिहिलं असेल, त्यावर क्लिक करायचं.
- यानंतर तुम्हाला Aadhaar Number च्या सेक्शनमध्ये तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
- सोबतच Captcha Verification सेक्शनमध्ये कॅप्चा कोड जो समोरील स्क्रीनवर दिसत असेल तो भरायचा आहे.
- हे सगळं भरल्यानंतर तुम्हाला Send OTP वर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी येईल, जो तुम्हाला Enter OTP च्या सेक्शनमध्ये टाईप करायचा आहे.
- आता तुमच्या स्क्रीनवर अपडेट करण्यासाठीचे सर्व पर्याय खुले असतील. ज्यात जन्मतारखेचा पर्याय निवडून तिथे योग्य जन्मतारीख नोंदवायची आहे.
- यानंतर जन्मतारीख खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी संबंधित वैध कागदपत्र जे स्क्रीनवर सांगितले आहेत, त्यापैकी एकाची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागले.
- यानंतर सबमिट केल्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारखेची माहिती 20 ते 90 दिवसांच्या आत अपडेट होईल.
केवळ एकदाच अपडेट करता येणार! महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या आधार नियमांमधील बदलांमुळे तुम्ही तुमची जन्मतारीख केवळ एकदाच अपडेट करु शकता. जर एकापेक्षा जास्त वेळा झालं तर त्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्राशी संपर्क करावा लागले.