दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेले उधाण यामुळे समुद्राने किनाऱ्यांवर फेकलेला कचरा पाहून मुंबईकरांनी डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. अनेक चौपाट्यांवरील कचरा उचलण्यासाठी पालिकेला जेसीबी आणावा लागला. एका दिवसात समुद्राने तब्बल 188 मेट्रिक टन कचरा किनाऱ्यांवर फेकला.
चौपाट्यांवरील कचऱ्याचे प्रमाण
वर्सोवा-जुहू चौपाटी : 110 मेट्रिक टन
दादर-माहीम चौपाटी : 50 मेट्रिक टन
मरीन ड्राईव्ह : 15 मेट्रिक टन
गोराई : 8 मेट्रिक टन
गिरगांव चौपाटी : 5 मेट्रिक टन
एकूण : 188 मेट्रिक टन
विविध चौपाट्यांवरील हा कचरा उचलण्यासाठी हजारो मनपा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. दिवसभर पालिकेचे कर्मचारी हा कचरा गाड्यांमध्ये जमा करत होते. त्यानंतर जमा केलेला हा कचरा मुंबईतल्या वेगवेगळ्या डम्पिंग ग्राऊंडवर पाठवण्यात आला.
व्हिडीओ पाहा
प्लॅस्टिक, कपडे, रेग्झिन, रसायने, सांडपाणी आणि कल्पनाही करता येणार नाही अशा अनंत वस्तूंच्या कचऱ्यामुळे किनाऱ्यांच्या जवळ मासे मिळणेही मच्छिमारांसाठी दुरापास्त झाले आहे. किनाऱ्याजवळ मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी आणि कचराच जास्त अडकतो.
मुंबईकरांनी टाकलेला कचरा समुद्राने परत केला, मरिन ड्राईव्हवर कचऱ्याच्या लाटा
वरवर केली जाणारी समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आपण नेहमीच टिव्हीवर किंवा वर्तमानपत्रांच्या फोटोंमध्ये पाहतो. परंतु जमिनीवरचा कचरा उचलला की काम संपलं असं होत नाही, समुद्राने अख्ख्या मुंबईचा कचरा आपल्या पोटात घेतला आहे. समुद्राला मुंबईकरांनी जे दिलंय तेच समुद्र वेळोवेळी परत करतो तेव्हा चित्र असंच भयाण असतं.