मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नावं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी सुचवली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा तरुण नेतृत्वाकडे द्यायची असल्यास सचिन पालयट आणि ज्योतिरादित्य सिंधिया यासाठी सक्षम आहेत, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.
येत्या 10 ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा मंजूर केला जाणार असून त्यानंतर पुढील अध्यक्ष कोण होणार? याचं चित्र स्पष्ट होईल. मिलिंद देवरा यांनी पायलट आणि सिंधिया यांचं नाव सुचवणे महत्त्वाची बाब आहे. कारण ते राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
याआधी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद युवा नेत्याकडे द्यावं ,अशी मागणी केली होती. अमरिंदर सिंग यांच्या मागणीला मिलिंद देवरा यांनी पाठिंबा दिला आहे. सचिन पायलट किंवा ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यास राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये स्थिरता येईल, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं.
प्रियांका गांधी यांच्या नावाचा विचार होईल का? याविषयी बोलताना मिलिंद देवरा यांनी म्हटलं की, प्रियांका गांधी काँग्रेस अध्यक्षा होत असतील तर मला आनंदच होईल. मात्र गांधी कुटुंबातील कुणीही अध्यक्ष होणार नाही, हे राहुल गांधींनी आधीच स्पष्ट केलं आहे.
अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी- शशी थरुर
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे. 10 ऑगस्टच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अंतरिम अध्यक्षाची निवड करावी आणि त्यानंतर निवडणुकीद्वारे नव्या अध्यक्षाची निवड करावी, असं काँग्रेस आणि देशासाठी हिताचं असेल, असं शशी थरुर यांनी म्हटलं.