मुंबई : वांद्रे येथील बेकायदा बांधकामांनंतर कंगनाने खार येथील राहत्या फ्लॅटमध्येही अनधिकृत बांधकाम केल्याचं उघडकीस आलं आहे. हे बांधकाम वाचवण्यासाठी कंगनाने दिंडोशी येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र दिंडोशी न्यायालयाने तिचा दावा फेटाळून लावला आहे. याविरोधात कंगना रनौतनं आता हायकोर्टात अपील केलं असून 5 फेब्रुवारीपर्यंत या बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.


खार पश्चिम येथील ऑर्किड ब्रीज इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगनाचे तीन फ्लॅट असून हे तीनही फ्लॅट तिनं एकत्र केले आहेत. ज्यात 50 टक्क्यांपेक्षा अतिरिक्त बांधकाम तसेच मुख्य स्ट्रक्चरमध्ये फेरफार केल्याने पालिकेने कंगनाला 26 मार्च 2018 रोजी नोटीस बजावली होती. या नोटीस विरोधात कंगनाने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करत पालिकेची नोटीस बेकायदा ठरवण्याची मागणी केली होती.


दिंडोशी न्यायालयाने कंगनाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या निकालाविरोधात कंगनानं आता हायकोर्टात अपील केलं आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी कंगनाच्यावतीने अॅड बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, "आपल्याला सदर बांधकाम हे रितसर अधिकृत करायचे आहे. त्यावर पालिकेच्यावतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 5 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. तोपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :