मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. कोविडचं संकट काही अंशी कमी होताना दिसत असल्याची चाहूल लागताच शासनानं लावलेल्या अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता दिली. याच पार्श्वभूमीवर काही व्यवहार हे पूर्ववत आणण्यासाठी आणि राज्याचा प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची बाब मंत्रीमहोदयांकडून स्पष्ट केली जात आहे.


यातच आता आदित्य ठाकरे यांनीही नाईट लाईफ पुन्हा सुरु करण्याची तयारी दाखवली आहे. कोविडनंतर लवकरच आम्ही पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरू करणार आहोत असं म्हणत, मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत ज्यामध्ये अद्यापही कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नसल्याचं त्यांनी सांगितलं. याच धर्तीवर नाईट लाईफही देखील लवकरच सुरू करू म्हणत त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही अधोरेखित केलं.


पर्यटनाच्या दृष्टीनंही महत्त्वाची पावलं


'आम्ही एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशीप करणार आहोत. आणि त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणार आहोत', असं सांगत राज्यातील पर्यटन क्षेत्रातही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचं आदित्य ठाकरे यांच्या वक्यव्यातून स्पष्ट झालं.


मुंबईत विटेज कार म्युझियम सुरू करणार आहोत. वरळीत हे म्युझियम असेल असं सांगत मुंबई विद्यापीठाकडून राजाभाई टॉवरसाठी प्रस्ताव आल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी रायगडावरील घटनेबाबतही प्रतिक्रिया दिली. रायगड मध्ये जो वाद झाला आहे याबाबत आम्ही बैठक घेऊ आणि तिथं जे प्राधिकरण आहे त्याबाबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ या शब्दांत ते व्यक्त झाले.


बाबो! क्रेननं हार घालत धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत


केंद्रासोबतही सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु असल्याचं सांगत केंद्राचं पथक राज्यात आलं आहे, शिवाय केंद्र आणि राज्य अशा स्तरावर नेहमी चर्चा सुरू असते. आमची जंबो कोव्हिडं सेंटरची संकल्पना त्यांनी घेतली आहे. आम्ही देखील त्यांच्या संकल्पना घेत आहोत. महिन्या दोन महिन्यांतून आशा भेटी होत असतात, असं ते म्हणाले.