मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. आगामी अर्थसंकल्प, भाजपमधल्या घडामोडी, मतदारसंघातल्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले अनेक दिवस सुधीर मुंनगटीवार यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सुधीर मुनगंटीवार महाविकास आघाडीवर टीका करत होते. प्रामुख्याने ते शिवसेनेवर निशाणा साधत होते. परंतु, आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात साधारण 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड बैठक पार पडली. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तसेच आता काहीच दिवसांत राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असावी, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
ज्यांना राजकीय अर्थ काढायचा आहे, त्यांना काढावा : सुधीर मुनगंटीवार
बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितलं की, "आजची बैठक ही माझ्या मतदार संघातील अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना राजकीय अर्थ काढायचा आहे, त्यांना काढू द्या. जर काही झालंच तर चांगलंच होईल की." पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "सध्या निवडणुका समोर ठेऊन काही राज्यांना निधी देण्यात आला आहे, असा आरोप केला जातोय. यामध्ये मी एक बाब स्पष्ट करतो की, केवळ त्या राज्यांची नावं घोषित करण्यात आली. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त निधी हा महाराष्ट्राला मिळाला आहे."