मुंबई : राज कुंद्रा तपासात सहकार्य करण्याऐवजी चौकशी दरम्यान आपला लॅपटॉप मधला डेटा तसेच व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इतरही चॅट डीलिट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा राज्य सरकारकडून हायकोर्टात करण्यात आला आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीतील आयटी प्रमुखाची अटक ही पूर्णपणे कायदेशीर असून ती योग्यच असल्याचा दावा मुंबई पोलिसांच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानं न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी या याचिकेवरील आपला निकाल सोमवारी राखून ठेवला.


अश्लील चित्रपटांना पैसे पुरवण्याच्या आणि इंटरनेटवर अपलोड करण्यात सक्रिय सहभागाप्रकरणी मुंबई पोलिसांनी व्यावसायिक राज कुंद्राला 19 जुलै रोजी अटक केली. मात्र सीआरपीसी कलम 41 (अ) नुसार पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटीस बजावणं गरजेचं असतानाही नोटीस न पाठवताच अटक केल्याचा दावा करत कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. तर कुंद्राचा याच प्रकरणातील साथीदार आणि आयटी हेड रायन थॉर्प यानेही अॅड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत याचिका केली आहे. 


राज कुंद्रा याच्या लॅपटॉपमध्ये हॉट शॉट्स आणि बॉलीफेम अॅपशी निगडित 51 अश्लील चित्रपट सापडले असून ही अश्लील सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच आणखीन एका आरोपीचा लॅपटॉप, सीडीआर, मोबाईल फोन, सॅन डीवाईस, स्टोरेज एरिया नेटवर्क डीवाईस ताब्यात घेतलेला आहे. कुंद्राच्या कार्यालयातील झडतीवेळी त्याच्या ई-मेलमध्ये हॉट शॉट्स संबंधित सामग्री सापडली तसेच हा ईमेल राजचा मेहुणा परदिप बक्षीकडून आला होता. बक्षीची केंनरीन प्रा. लिमिटेड नामक लंडनमध्ये कंपनी असून पोलीस त्याचा मागोवा घेत असल्याचा दावा या सुनावणी दरम्यान, मुख्य सरकारी वकील अरूणा पै कामत यांनी केला. तसेच या अश्लील व्हिडीओचे किती ग्राहक आहेत?, किती जणांनी व्हिडीओसाठी पैसे मोजले आहेत? त्यांच्याही अकाऊंटची माहिती उपलब्ध झाली आहे असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच पोलिसांनी कुंद्रा व थॉर्पला 41 (अ) अंतर्गत नोटीस बजावली होती. राज कुंद्राने ती नाकारली तर रायन थॉर्पने स्विकारली. मात्र चौकशीदरम्यान दोघांनीही आपले व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इतरही चॅट व डेटा डिलिट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना अटक करण्यात आल्याचंही राज्य सरकारनं हायकोर्टाला सांगितलं. 


मात्र राज्य सरकारचा हा दवा चुकीचा असून पंचनामा स्पष्ट सांगतो की चौकशी सुरू व्हायच्या आधीच पोलिसांनी दोघांचेही मोबाईल, लॅपटॉप जप्त केले होते. मग चौकशी दरम्यान आरोपी डेटा डिलीट करत होते, हा आरोप कसा करता येईल?, मुळात हा आरोप फेब्रुवारीच्या चौकशीतही नंतर करण्यात आला होता, जुलैच्या चौकशीत नाही. फेब्रुवारी 2021 मधील पोलीस चौकशीत त्याची नोंदही आहे, मात्र जुलैमधील चौकशीत अथवा कागदोपत्री याचा कुठेही उल्लेख नाही. राज कुंद्रा आणि रायन थॉर्प हे दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून लवकर त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट आपला निकाल देईल अशी अपेक्षा आहे.