मुंबई : मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक आज दुपारी शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आला. मुंबई विमानतळाला 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' हे नाव असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 'अदानी एअरपोर्ट' नावाचा फलक कसा काय लावण्यात आला? असा प्रश्न विचारत शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी हा फलक फोडून आंदोलन केलं.
मागील महिन्यात 13 जुलैला मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे आल्यानंतर 'अदानी एअरपोर्ट' चे नाव विमानतळावर ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. जिथे जीव्हीके कंपनीचे नावाचे फलक होते तिथे आता 'अदानी एअरपोर्ट' नावाचे फलक झळकत आहेत . त्यावरच शिवसेनेने आक्षेप घेत मुंबई विमानतळावर अशा प्रकारचे फलक लावण्यात येऊ नये आणि मुंबई विमानतळाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ'च असून हे नाव बदलण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असा इशारा सुद्धा दिला होता.
ज्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट नावाचे फलक शिवसेना कार्यकर्त्यांनी फोडले त्याठिकाणी आधी जीव्हीके कंपनीच्या लोगोसह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव देखील होते. मात्र , आता अदानी समूहाकडे ताबा येताच फक्त 'अदानी एअरपोर्ट' हे नाव त्या ठिकाणी देण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले, अशा प्रकारचे अदानी एअरपोर्टचे फलक मुंबई विमानतळ असतील ते फलक काढून टाकण्यात यावे, अशा प्रकारचं निवेदन भारतीय कामगार सेनेच्या वतीने व्यवस्थापनाला देण्यात येणार आहे
अदानी समुहाचं स्पष्टीकरण
झालेल्या सगळ्या प्रकारानंतर अदानी समूहाकडून सुद्धा या सगळ्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) येथे अदानी विमानतळांच्या ब्रँडिंगच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बाबतीत, आम्ही ठामपणे आश्वासन देतो की अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) ने फक्त पूर्वीच्या कंपनीच्या ब्रँडिंगची जागा अदानी विमानतळ कंपनीच्या ब्रँडिंगने घेतली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व टर्मिनलच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (CSMIA) मधील ब्रँडिंग हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आले आहे. तसेच अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेड (AAHL) मोठ्या प्रमाणावर विमान वाहतूक समुदायाच्या हितासाठी सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत राहील", असे एएएचएल च्या प्रवक्त्याने सांगितले.