मुंबई : माराहाणीचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या महाविद्यालयीन तरुणांना हायकोर्टानं मार्च महिन्यातील चारही रविवारी माहीम दर्गा आणि माहीम कबरीस्तानची सफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील दोघेजण हिंदू असल्यानं त्यांचा काही आक्षेप असल्यास त्यांना सिद्धिविनायक मंदिर साफ सफाईसाठी निवडण्याचा पर्याय देण्यात आला होता.
मात्र दोघांनीही माहीम दर्गा परिसरात साफसफाई करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं कोर्टाला सांगितल्यानं हायकोर्टानं चौघांना माहीम दर्गा परिसरात साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
डिसेंबर 2017 मध्ये माहीम दर्गाच्या ऊरुसदरम्यान ही घटना घडली होती. काही शुल्लक कारणावरून चार तरुणांमध्ये झालेल्या वादावादीचं हाणामारीत रुपांतर झालं होतं. त्यानंतर चौघांनीही परस्परांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी माहीम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. या घटनेची दखल घेत मुंबई पोलिसांनी चारही तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला होता.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी चारही तरुणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
याप्रकरणी जेष्ठ वकील रिझवान मर्चंट यांनी अमायकस क्युरीची (कोर्टाचा मित्र) भूमिका बजावताना कोर्टाला सांगितलं की चारही जणांचं वय आणि घडलेल्या गुन्ह्याचं स्वरुप लक्षात घेता त्यांना कठोर शिक्षा देऊ नये. त्यानुसार चौघांचं वय आणि त्यातील दोघांच्या शैक्षणिक वर्षाचं महत्त्व लक्षात घेता हायकोर्टानं त्यांची याचिका स्वीकारत त्यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
कायद्याची जरब बसावी या हेतूनं हायकोर्टानं त्यांना त्याच परिसरातील माहीम दर्गा आणि माहीम कबरीस्तान येथे येत्या मार्च महिन्यातील चारही रविवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत साफसफाई करण्याची सौम्य शिक्षा दिली आहे.