नवी दिल्ली : आगामी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालून टीम इंडियानं त्यांना आयते दोन गुण देणं आपल्याला आवडणार नाही. पण सर्वोच्च पातळीवर पाकिस्तानशी न खेळण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रहित म्हणून त्या निर्णयाशी आपण बांधील राहू, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही स्पष्ट केलं आहे.


पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धच्या 16 जूनच्या विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी देशात जोर धरु लागली आहे. हरभजनसिंग आणि सौरव गांगुलीसारख्या माजी कसोटीवीरांनीही त्या मागणीचं समर्थन केलं आहे. पण सुनील गावस्करांपाठोपाठ सचिननंही पाकिस्तानला विश्वचषकाच्या मैदानात लोळवण्याला पसंती दिली आहे.


भारताने विश्वचषकाच्या मैदानात पाकिस्तानला नेहमीच हरवलं असून, टीम इंडियाचं पाकिस्तानवरचं वर्चस्व दाखवून देण्याची ही वेळ आहे, असं त्यानं सांगितलं. पाकिस्तानला आयते दोन गुण बहाल करून त्यांना विश्वचषकात मदत करणं आपल्याला पसंत नाही, असं त्यानं विनयानं नमूद केलं.


आगामी विश्वचषकातल्या पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असं बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय यांनी नवी दिल्लीतल्या बैठकीनंतर स्पष्ट केलं.


मात्र दहशतवादाला पोसणाऱ्या देशासोबत यापुढच्या काळात आपण संबंध तोडण्याची गरज असल्याचं आवाहन त्यांनी आयसीसी आणि आयसीसीला संलग्न देशांना उद्देशून केलं. विश्वचषकातला भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. 16 जून ही तारीख अजूनही खूप दूर असल्याचं सांगून, या सामन्याबाबत केंद्र सरकारच्या सल्ल्यानं आम्ही निर्णय घेऊ, असं विनोद राय म्हणाले.


व्हिडीओ -