मुंबई: मुंबई लोकलचा प्रवास म्हटल्यावर अगदी कपाळावर हात मारायची वेळ येते. तुम्हा-आम्हासारख्या सामान्यांनाच मुंबईच्या लोकलचा प्रवास करणं त्रासदायक वाटतं, त्यात दिव्यांगांची काय अवस्था होत असेल याची आपण कल्पनाही करु शकत नाही. दिव्यांग प्रवाशांच्या अनेक प्रश्नांवर 'इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स अँड लॉ'च्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दिव्यांगांच्या हितासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेमार्फत करण्यात आली होती.


या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. दिव्यांग व्यक्तींना लोकलमध्ये चढता-उतरताना त्रास होतो, यासाठी डब्यात चढण्या-उतरण्यासाठी विशेष रॅम्प लावण्यात यावेत जेणे करून दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होणार नाही, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारचा रॅम्प तयार करणे अशक्य असून लोकल स्टेशनवर फक्त 20 ते 25 सेकंदांसाठीच थांबते, अशावेळी रॅम्प उभारल्यास प्रत्येक स्थानकावर त्याची उघड झाप होण्यास बराच अवधी लागेल त्यामुळे लोकलचा वेग मंदावेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण वाहतुकीवर होईल. म्हणूनच हे रॅम्प उभारणे अशक्य असल्याचं रेल्वे प्रशासनाच्यावतीने पुन्हा एकदा निदर्शनास आणून देण्यात आलं आहे.


मुंबईतील लोकलमधून अनेक दिव्यांग प्रवास करतात आणि सगळ्याच दिव्यांगांना बस, टॅक्सी, रिक्षा यांसारखी खाजगी वाहनं परवडत नाहीत, त्यामुळे ते रेल्वेने प्रवास करणं निवडतात. रेल्वेचा प्रवास हा जलद आणि सोपा मार्ग आहे. म्हणूनच त्यांना इथे सुविधा मिळणे आवश्यक असल्याचं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं. तेव्हा, काही रेल्वे स्थानकांवर दिव्यांगासाठी व्हिल चेअर ठेवण्यात आल्या असल्याचं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र प्रतिज्ञापत्रावर सारी माहिती दिसत असली तरी प्रत्यक्षात तसं होतं का? एखाद्या लोकलमधून प्रवास करताना दिव्यांगासाठी व्हिल चेअर जरी उपलब्ध करून देण्यात आली तरी अशा किती स्थानकावर व्हिल चेअर आहेत? आणि काहीवेळा स्थानकांवर येणारी लोकल फलाट क्रमांक बदलते तेव्हा त्यांना फलाटावर दिव्यांगासाठी व्हिल चेअर उपलब्ध असेल का? असे काही सवालही खंडपीठाने उपस्थित केले.


कधी कधी दिव्यांग व्यक्ती या शारिरीकच नाही तर ते मानसिकरित्याही अस्वस्थ असतात. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सोयी सुविधांच्या अभावामुळे दिव्यांगांना रेल्वे स्थानकांत येण्याचे धाडसच होत नाही. त्यामुळे रॅम्प आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा या सर्व पुढच्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम दिव्यांगासाठी रेल्वे स्थानकावरील वातावरण हे दिव्यांगपुरक बनवा, जेणेकरून त्यांचा प्रवास सुखकर होईल आणि आम्ही ही याचिका जरी निकाली काढली असली तरी त्याचा अर्थ आम्हाला दिव्यांगाबाबत सहानभूती नाही असं नाही. पण अनेकवेळा वास्तविकता तपासणे आवश्यक असल्याचे सांगत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली.