मुंबई : मुंबई महापालिकेच्या उपनगरांमधील रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. चार नगरसेवकांचं नगरसेवकपद रद्द झाल्यानं दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी त्या नगरसेवकपदावर आपला हक्क सांगत कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र यावर निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला इथे फेरनिवडणुका घेण्यापासून थांबवता येणार नाही, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने पोटनिवडणूका जाहीर करण्यास परवानगी दिली आहे.

Majha Vishesh | महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार, मग शिवसेनेला काय मिळणार? | माझा विशेष | ABP Majha



महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचं जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 76, 32, 81 आणि 28 मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यासंबंधितची एक अधिसूचनाही नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितीन सलाग्रे (काँग्रेस), गीता भंडारी, संदिप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

मात्र निवडणूक आयोगानं सध्या केवळ मतदारयादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे या प्रभागांत अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र मतदारयाद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता आहे, असं निवडणूक आयोगाच्यावतीनं कोर्टात स्पष्ट करण्यात आलं होतं.