नवी मुंबई : मराठीच्या मुद्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. तमिळसह संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम, ओडीआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मग मराठीला का नाही? असा सवाल करीत मनसेने आंदोलन छेडले आहे. यातील पहिले पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोंदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मागणी केली आहे. नवी मुंबई मनसेच्या वतीने आज वाशीतील पोस्ट कार्यालयातून ही पोस्टकार्ड नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली.

MNS | मराठीच्या अभिजात दर्जासाठी मनसे मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवणार | ABP Majha



मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करुन आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासाठी केंद्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी मनसेने दिल्ली दरबारी पंतप्रधान कार्यालयाला 10 हजार पोस्ट कार्ड पाठवले आहेत . या मोहिमेत मराठी जनतेने सामील होण्याचे आवाहन मनसेने केले आहे.


पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे, सादर केली आहेत. मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचविणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.

VIDEO | विधानसभा मनसेसाठी अस्तित्त्वाची लढाई ठरणार? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा