मुंबई : मुंबईत मेट्रोचं सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच लक्षात घेत मुंबईच्या वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अवजड वाहनांची गर्दी आणि वाहनांमुळे होणारा ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच सध्या दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

अवजड वाहनांवरील बंदीसाठी एक विशिष्ट वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10
या वेळेत दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश नसेल.

एसटी, बेस्ट बस, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बस, पाणी-दूध-भाज्यांसारख्या अत्यावश्यक सेवा किंवा पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारी वाहनं, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.

सकाळी नोकरदारांची ऑफिसला जाण्याची आणि संध्याकाळी परत येण्याची वेळ लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आलं आहे. अवजड वाहनांमुळे तासतासभर एकाच जागी अडकून पडायला लागतं. या निर्णयामुळे मुंबईकर भलताच खुश आहे.