वसई: प्रसुतीकळा सुरु  झालेल्या एका महिलेला अग्निशमन विभागाने चक्क बोटीतून सुखरुपपणे रुग्णालयात नेलं. आशा जीवन डिसूजा असं या महिलेचं नाव आहे. ती वसईच्या शंभर फुटी रस्यावरील मथुरा या इमारतीत राहते.

वसई विरार क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वाहनं आणि पालिकेची परिवहन सेवा, तसंच रिक्षाही बंद आहेत. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेची अग्निशमन दलाचे जवान धावून आले.

त्यांनी या महिलेला वसईच्या 100 फूटी रोडवर बोटीत बसवून, हॉस्पिटलच्या काही अंतरावर जेथे पानी कमी साचले होतं, त्याठिकाणी नेलं. आणि रुग्णालयात दाखल केलं. अग्निशमन जवानाच्या या कार्याच सर्वानी कौतुक केलं आहे.

वसई-विरारमध्ये धुवाँधार पाऊस

विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस धुवाँधार पाऊस कोसळत आहे. आजही पावसाचा जोर कायम आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बोरिवली ते विरार ही रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

विरार, नालासोपाराबरोबर वसईतही मोठा पाऊस होतोय. वसईतला सनसिटी भागात प्रचंड पाणी साचलं आहे. परवा तर याठिकाणी काही लोकांनी चक्क होडी आणून इथं साचलेल्या पाण्यातून प्रवास केला होता.

धो-धो कोसळल्यानंतर वसईत पाऊस काही मिनिटं विश्रांती घेतोय खरा, मात्र पुन्हा जोरदार सरी बरसत असल्यामुळे साचलेलं पाणी ओसरत नाही.

वसई विरार क्षेत्रात पावसाचा क़हर सुरु आहे.  ज्या भागात गेल्या 30 वर्षात कधीही पाणी साचलं नाही तिथं पूरस्थिती निर्माण झाली आहे.

मिठागारातील वस्तीला पुराने वेढलं

वसई पूर्व भागात असलेल्या मिठागारातील वस्ती पुरानं वेढलेली असतानाही 400 जणांनी घरं सोडण्यास नकार दिला आहे.

कालपासून इथं मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे कालच्या पेक्षाच्या आजची स्थिती भीषण आहे. इथं पाण्याच्या पातळीमध्येही मोठी वाढ झाली आहे. लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. काही लोकांना बाहेरही काढलं जात आहे. मात्र, या वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. होड्यांचा आधाराने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. विरार वसई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत.

मुंबई पाऊस LIVE : मुंबईत जोरदार पाऊस, लोकल, रस्ते वाहतूक विस्कळीत