मुंबई : बॉलिवूडचा किंगखान शाहरूखसाठी गुरूवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला गुरुवारी ठरणार आहे. बुधवारी या प्रकरणी आर्यनसह मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतलेल्या त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि या प्रकरणातील सहआरोपी मुनमुन धमेचा यांच्या वतीनं युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. आता गुरुवारी तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्यानं एनसीबी आपली बाजू मांडणार असून त्यांनतर न्यायालय काय निर्णय देतं त्यावर आर्यनचं भवितव्य ठरणार आहे.    


मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या आलिशान क्रुझवरून ड्रग्स एनसीबीकडून जप्त करण्यात आलं. यावेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. आर्यनसह हे दोघेही गेल्या तीन आठवड्यांपासून आर्थर रोड कारागृहात कैद आहेत.


नवाब मलिक यांना आवरा, वानखेडेंवरील आरोप थांबवा; एका मौलानांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका


अरबाझ मर्चंटविरोधात बजावण्यात आलेला मेमोमध्ये केवळ अमली पदार्थ सेवनाचे आरोप असून एनडीपीएस कलम 29 अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा हा नंतर जोडण्यात आल्याची माहिती मर्चंटच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला दिली. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 (अ) नुसार संबंधित पोलीस अधिकारी आरोपीला अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याची नोटीस बजावतो. जर त्या व्यक्तीने नोटीशीचं पालन केलं नाही तर पोलीस पुढील निर्णय घेऊ शकतात, मात्र इथं थेट अटकेची कारवाई करण्यात आली. 


Aryan Khan : आर्यन खान जामीन याचिकावरील सुनावणी उद्यावर ढकलली, आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार


अरबाझच्या व्हॉट्अअँप चॅट्सवरून तो कोणत्याही षडयंत्रात सहभागी असल्याचे सिद्ध होत नाही. तसेच हे व्हॉट्अअँप चॅट्स न्यायालयात रेकॉर्डवर येण्याआधीच बाहेर मीडियाकडे लीक झाल्याची माहितीही कोर्टाला देण्यात आली. या प्रकरणी जास्तीत जास्त एका वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अरबाझला जामीन देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली. तर मुनमुन धमेचाकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. तिच्या विरुद्धचा गुन्हा इतर प्रकरणातील आरोपांची कॉपी पेस्ट केल्याचा प्रकार आहे, असा दावा मुनमुनच्या वतीने वकील अली काशिफ खान देशमुख यांनी केला. जर या प्रकरणात त्यांनी संशयित म्हणून मुनमुनसह अन्य दोघांना अटक केली असेल, तर त्यावेळी तिथं उपस्थित सर्व 1,300 पर्यटकांना अटक व्हायला हवी होती. तसेच एनसीबीनं अत्यंत हुशारीनं कमी प्रमाणात अमली पदार्थ असणाऱ्यांना मध्यम प्रमाणात अमली पदार्थ सापडलेल्यांसोबत जोडलेलं आहे. जेणेकरून सर्वांनाच या एका कथित कटाचा भाग दाखवून अडकवता येईल असा दावा करत देशमुख यांनी आपला युक्तिवाद संपवला. 


तेव्हा आता गुरूवारी एनसीबीच्या वतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे बाजू मांडणार आहेत. एनसीबी मुंबई सत्र न्यायालयातील आरल्या दाव्यावर हायकोर्टातही ठाम असून या तिघांच्याही जामीनाला ते विरोध करणार आहेत. त्यानंतर न्यायालय गुरुवारीच हायकोर्ट यावर निर्णय देणार की, निकाल राखून ठेवत तो कधी जाहीर करणार याचं उत्तर मिळेल, ज्यावर आर्यनचं भवितव्य ठरणार आहे.


Mumbai Drug Case: एनसीबीकडून अधिकारांचा दुरुपयोग, आर्यन खानच्या अटकेवर जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांची प्रतिक्रिया