Mumbai Drug Case: आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपासयंत्रणेने ताणून धरले आहे. तो सर्वसामन्याचा मुलगा असता तर, एवढे झालेच नसते. आर्यन खानला याप्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी करण्यात आला. मुंबई ड्रग्जप्रकरणी गेल्या 20 दिवसांपासून तरूंगात आर्यन खानकडून एनसीबीला कोणताही अमली पदार्थ सापडला नाही. तसेच आर्यन बेकायदेशीररित्या अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा एनसीबीकडे कोणताही पुरावा  नाही. आर्यनसोबत असलेला त्याचा मित्र अरबाज मर्चंटकडे अमली पदार्थ सापडला म्हणून एनडीपीएस अँक्टनुसार आर्यनला जबाबदार धरता येणार नाही, असा युक्तिवाद आर्यनच्या जामीनासाठी जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी हायकोर्टात केला.


मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान क्रुझवर छापा टाकून ड्रग्स एनसीबीनं अमली पदार्थ जप्त केले. यावेळी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली. आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, आर्यन हा एक 23 वर्षांचा युवक असून तो कॅलिफोर्नियात शिकतो. तो क्रुझवर एक पाहुणा म्हणून गेला होता. त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याबाबतची कोणतीही वैद्यकीय तपासणी केलेली नाही. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी कोणतेही कारण नव्हते.


 मुळात एनडीपीएस कायद्यात जरी कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास अटक करून जेलमध्ये टाकण्याऐवजी सुधारण्याची संधी दिली जाते. आरोपीला जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. मात्र, येथे ही मुले 20 दिवस जेलमध्ये आहेत. आर्यनकडून कोणताही अमली पदार्थ जप्त केला नाही. त्याचे सेवनही केलेले नसेल तर, त्याला चुकीच्याच पद्धतीने अटक करण्यात आली आहे, हे सिद्ध होते. युक्तिवाद आर्यनच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी यांनी केला. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटकडे 6 ग्रॅंम चरस सापडल्याचा दावा एनसीबीने केला. परंतु, आर्यनकडे कोणतीही प्रतिबंधित साहित्य सापडले नाही. केवळ सोबत असलेल्या मित्राच्या बुटात काही सापडल, याला आर्यन कसा जबाबदार? असा सवालही रोहतगींनी उपस्थित केला. एनडीपीएस कलम 67 अंतर्गत एनसीबी अधिकार्‍यांनी नोंदवलेले जबाब पुराव्यासाठी ग्राह्य धरता येणार नाहीत. 6 ग्रॅम हे एक लहान प्रमाण असून त्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत शिक्षा आहे, असा दावाही रोहतगी यांनी कोर्टात केला. तसेच आर्यनचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे साल 2018 ते 2020 पर्यंतचे असून 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या क्रूझ पार्टीशी ते कुठेही संबंधित नाहीत. त्यामुळे त्याला जामीन द्यावा, अशी मागणी करत मुकुल रोहतगी यांनी आपला युक्तिवाद संपवला. अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं बुधवारी युक्तिवाद होणार असून त्यानंतर एनसीबी आपला युक्तिवाद करेल.



प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राशी आमचा काहीही संबंध नाही-


या खटल्यातील पंच साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने केलेल्या कथित खुलाशांवरून निर्माण झालेल्या वादाचा आर्यनच्या जमिनाशी काहीही संबंधित नाही. आमची कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नाही. त्याला या वादापासून दूर ठेवत गुणवत्तेच्या आधारावर याचिका ऐकण्याची विनंतीही रोहतगी यांनी न्यायालयाला केली. मात्र त्यांनी आपल्या युक्तिवादा दरम्यान नवाब मलिक, समीर वानखेडे आणि कोर्टाबाहेर सुरू असलेल्या आरोपपर्यारोपांच्या युद्धाची हायकोर्टाला थोडक्यात कल्पना दिली. तर एनसीबीनंही प्रभाकर साईलच्याबाबतीत भूमिका स्पष्ट करत हा पंच साक्षीदार फुटला असून त्याच्या दाव्यांची दखल घेऊ नये अशी विनंती हायकोर्टाला केली. 


या प्रकरणातील दोन आरोपींना एनडीपीएस कोर्टाकडने जामीन मंजूर-


तर दुसरीकडे, या खटल्याशी संबंधित दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. मनीष राजगरिया आणि अविन साहू या दोन आरोपींना प्रत्येकी 50,000 च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या दोघांकडने वैयक्तिक सेवनाकरता आणलेला किरकोळ गांजा तपासादरम्यान जमा करत त्यांना अटक करण्यात आली होती.


संबंधित बातम्या-