मुंबई: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा असली की राज्यातल्या शिवसैनिकांचे पाय त्यांची सभा असेल त्या ठिकणी वळायचे. मग ते ठिकाण शिवतीर्थ असो किंवा षण्मुखानंद. तोबा गर्दी उसळलेली असताना बाळासाहेब ठाकरे बोलायला उभे राहिले की काही सेकंद आधी एक तुतारी संपूर्ण ताकदीनिशी फुंकली जायची आणि गर्दीला उमगायचं 'आता साहेब बोलणार'. आजही प्रत्येकाच्या कानात ही तुतारी जितक्या ताठ मानेनं वाजतेय तितकीच दयनीय अवस्था ही तुतारी वाजवणाऱ्या कलावंताची झाली आहे. त्याचं नाव आहे हरदास गुरव उर्फ हरिओम तुतारीवाला.


गेल्या अनेक वर्षांपासून हरिओम शिवसेनेच्या मेळाव्यात.. सभांत तुतारीवादन करत असल्याने बहुतांश नेत्यांना तो परिचयाचा आहे. हरिओम आपल्या वडिलांकडून तुतारीवादन शिकला आहे. मूळचा सांगलीच्या विट्याचा असणारा हरिओम मुंबईत आला तो 1996 मध्ये. त्यावेळेपासून शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात पारंपरिक मावळ्याचा पोषाख करून  तो शिवकालीन वाद्य असलेलं तुतारी वादन करतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभांआधी किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या आगमना आधी हरदास तिथे हजर असतात. त्यांचं आगमन झालं की पारंपारिक पोशाखातला हा मावळा त्वेषाने तुतारी फुंकून स्वागत करतो. तुतारी वाजवण्याच्या या कलेने त्याला किडनीचा विकारही जडला. आता त्यांची एक किडनी खराब होऊ लागली आहे. किडनीचं ऑपरेशनही करणं  आवश्यक बनलं आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना हरिओम म्हणाला, 'तुतारी वाजवणं हेच माझं काम होतं. पण तुतारी वाजवायला गेलं की वेळ व्हायचा. नेते यायला उशीर झाला की मला उशीर व्हायचा. सहा-सहा तास पोषाखात उभा असायचो. लघुशंकेला जायला मिळायचं नाही. पाणी कमी प्यायचो. त्यातून उशीर झाला की मिळेल तसं खाणं व्हायचं. अनेक वर्षं असं केल्यामुळे किडनीवर परिणाम झाला.आता एक किडनी निकामी व्हायच्या मार्गावर आहे. तिचंही ऑपरेशन करायला हवं.'



तुतारी वादनाचं काम मिळालं की हरदास यांना पाचशे ते दोन हजार असं मानधन मिळातं. त्यातही ठरलेला दर नसतो. जसे मिळतील तसे कमावून कुटुंबाचं पोट भरायचं हे हरिओम यांनी ठरवलेलं. 'पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा आहे मला. कलाकाराचं इन्कम ठरलेलं नसतं. तसं माझंही नव्हतं. पण घर चालत होतं. आता गेल्या सात महिन्यांपासून काम नाहीय. त्यात किडनीचा विकारही बळावला आहे. मी आता गेल्या महिन्यापासून वॉचमन म्हणून काम करतोय. पण घराचं भाडं थकलं आहे. किडनीचा उपचार करणं गरजेचं आहे',  असं हरिओम सांगतो. 'मला व्यक्तिगत पैसे नकोयत. माझं घरभाडं थकलं आहे. लाईटबिल थकलं आहे. सात महिने काम नाहीय. त्यात किडनीचा आजरही बळावला आहे. त्यासाठीही खर्च आहे. आता पैसे कसे उभे करायचा हा प्रश्न आहे. अनेक शिवसेनेच्या ओळखीतल्यांना फोन केले पण ते फोन घेईनात. काहीच पर्याय नसेल तर मग जगून तरी काय करू,' असा सवाल तो 'एबीपी माझा'कडे करतो.



याची दुसरी बाजूही आहे. कोणत्याही भाषणावेळी.. कार्यक्रमावेळी आमंत्रण नसताना हरिओम हजर व्हायचा. त्यामुळे काही मंडळी त्याला अव्हेरायची असंही कळतं. पण आता स्थिती वेगळी आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर हरिओमलाही हतबल वाटू लागलं आहे. आजवर मी शिवसेनेकडे एक रुपया मागितला नाही. जे दिलं त्यावर आनंद मानला. पण आता मला गरज आहे असं तो कळकळीनं सांगतो. अनेक आर्जवं करूनही उपयोग झाला नाही तर शिवतीर्थावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मदहन करावं की काय असे विचारही मनात येऊ लागल्याचं सांगतोय. हरिओम घाटकोपरला भाड्याच्या घरात राहतो. गेल्या काही महिन्यांपासून थकलेलं ४० हजारांचं भाडं आणि किडनीचा येणारा खर्च आता कसा उभा करायचा या विवंचनेनं तो पार खचून गेला आहे.



सध्या त्याच्या किडनीच्या उपचारासाठी तो जे जे हॉस्पिटलमध्ये आहे. तिथल्या सहाव्या मजल्यावरून त्याने केलेला व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्याला सध्या त्याच्या विवंचनेतून बाहेर पडण्याइतपत मदत व्हावी अशी अपेक्षा तो व्यक्त करतो.