मुंबई : मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेचे पेपर सकाळी 11 ते 12 या वेळेत होते. मात्र मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य होणार नाही त्यांनी चिंता करू नये. त्यांची परत परीक्षा घेतली जाईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. आज वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षा होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या घेतली जाणार असल्याचं विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
ज्या विद्यार्थ्यांना पेपर देता आले नाहीत त्यांना पुढे पेपर देण्यासाठी संधी
ज्या क्लस्टर कॉलेजेसने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे ते परीक्षाच वेळापत्रक जाहीर करून परीक्षा घेतील, असं मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. प्रत्येक क्लस्टर कॉलेज आपल्या क्लस्टरमध्ये असलेल्या कॉलेजचे निर्णय घेऊ शकतात. संपूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली नाही, ज्या विद्यार्थ्यांना पेपर देता आले नाही त्यांना पुढे पेपर देण्यासाठी संधी दिली जाईल. याशिवाय, क्लस्टर महाविद्यालय जर त्यांच्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असेल तर त्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.
उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
मुंबई अंधारात! वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबई, ठाणे परिसर प्रभावित; लोकल ठप्प, विद्यार्थी चिंतेत
वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम
बेस्ट, अदानी, एमएसईबीच्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसला. मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. नवी मुंबईत देखील वाशी, नेरुळ, खारघर, पनवेल या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली आहे. तर आज बहुतेक मुलांच्या ऑनलाईन परीक्षा असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. लाईट गेल्यामुळे अनेक ठिकाणची लोकल सेवा देखील खंडीत झाली.
रेल्वे सेवा विस्कळीत
विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला ते सीएसटी लोकल ठप्प झाली होती. वीजपुरवठा सुरु झाल्यानंतर हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे.