मुंबई : मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात वीज गायब झाली असून. बेस्ट, अदानी, एमएसइबीच्या भागात वीज नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली असून प्रवासी अडकले आहेत. तसंच सिग्नल यंत्रणाही बंद झाली आहे. याशिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांनाही वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका बसत आहे.


मुंबई, दहिसर, चेंबूर, प्रभादेवी, मालाड, कांदिवली, वांद्रे, विले पार्ले, पवई या तर ठाण्यातही काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.


महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. मुंबईतील मोठ्या भागातील विजप्रवाह खंडीत झाल्याने मुंबई अंधारात गेली आहे. तर आज बहुतेक मुलांच्या ऑनलाईन परीक्षा असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. लाईट गेल्यामुळे अनेक ठिकाणची लोकल सेवा देखील खंडीत झाली आहे.


वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम..


वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परिक्षा आहेत. त्यामुळे वीज गेल्यानं पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परिक्षेचे पेपर सकळी 11 ते 12 या वेळेत आहेत. मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देणं शक्य होणार नाही, त्यांनी चिंता करू नये त्यांची परत परीक्षा घेतली जाईल, असं विद्यापीठाकडून संगण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइलवर परीक्षा देता येत असेल त्यांनी पेपर द्यावा अन्यथा पेपर नंतर घेतला जाईल. त्याबाबत विद्यापीठ लवकरच माहिती देईल. आज दुपारी 1ते 2 दरम्यान सुद्धा पेपर आहेत. पण तोपर्यंत वीज येईल का? त्याबाबत बघून पुढचा निर्णय घेऊ असेही विद्यापीठाने सांगितलं आहे.


रेल्वे सेवा विस्कळीत
विजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने कुर्ला ते सीएसटी लोकल ठप्प झालीय. अर्ध्या तासांपासून प्रवाशी अडकले आहेत.